चित्रपटांमध्ये कोणतंही दृश्य अधिक वास्तववादी दाखवण्यासाठी निर्माते- दिग्दर्शक बरीच मेहनत घेतात. यात त्यांना साथ मिळते ती कलाकारांची. गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट अधिक परिणामकारकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्टंट्स दाखवण्यात येत आहेत. या स्टंट्ससाठी काही कलाकार डमीचा वापर करतात. तर, काही कलाकार स्वत:च तो थरार अनुभवण्याचा अट्टाहास करतात. अशाच काही अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सलमान खान. बॉलिवूडचा दबंग अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. पण अशाच भूमिका साकारताना एका चित्रपटाच्या वेळी सलमान अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परतला होता. खुद्द सलमाननेच एका मुलाखतीदरम्यान याबाबतचा खुलासा केला.

२००३ मध्ये ‘तेरे नाम’मधून सलमान ‘राधे’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या भूमिकेसाठी त्याची बरीच प्रशंसा करण्यात आली होती. सलमानच्या चित्रपट कारकिर्दीत ‘तेरे नाम’चं महत्त्वाचं स्थान आहे. पण, याच चित्रपटाच्या वेळी तो मृत्यूच्या दारातून परतला होता ही बाब अनेकांना ठाऊकही नसावी. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेल्वे रुळाजवळील दृश्यावर काम सुरु होतं. यामध्ये राधे म्हणजेच सलमान रुळाच्या अगदी जवळ दाखवण्यात आला होता. ‘लाइट्स, कॅमेरा…’ सेट झाला आणि ‘अॅक्शन’ म्हणताच चित्रीकरण सुरु झालं. त्याचवेळी रुळावर ट्रेन येत होती आणि हे सलमानलाही ठाऊक होतं. पण, त्यावेळी त्याला काय करावे हे कळत नसल्याने तो तेथेच स्तब्ध उभा राहिला.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

सर्व काही सुरळीत सुरु असतानाच ट्रेनचा वेग वाढल्याचं आणि ती ट्रेन सलमानच्या जवळ येत असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. त्याचवेळी तिथे उपस्थित एका सहकलाकाकाराने सलमानला जोरात धक्का दिला. त्याला धक्का देण्याची आणि त्याच वेळात तिथून ट्रेनने सुसाट जाण्याची ती वेळ बरंच काही सांगून गेली होती. सहकलाकाराने धक्का दिल्यामुळे सलमान रुळाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. त्यावेळी अगदी काही क्षणांचा विलंब झाला असता तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नसता. कलाकार बऱ्याचदा कोणतीही भूमिका साकारताना कशाचीही तमा न बाळगता त्या भूमिकेत सर्वस्व पणाला लावतात. पण, कधीकधी हीच बाब त्यांच्यासाठी धोक्याची ठरते याचाच प्रत्यय भाईजान सलमानला त्यावेळी आला असावा.