सध्याच्या घडीला अभिनेता सलमान खान सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता असून वयाची पन्नाशी पूर्ण होऊनही त्याच्या लोकप्रियतेत तसूभरही घट झाली नाहीये. अभिनयासोबतच हा दबंग खान विविध क्षेत्रांमध्येही सक्रिय आहे. ‘बिइंग ह्युमन’ या त्याच्या संस्थेतर्फे बऱ्याच गरजूंना मदत केली जाते. त्यामुळे सलमान स्वत:ला वेळ देतो की नाही, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन आहे. पण, तसं नाहीये. सलमान स्वत:सुद्धा खूप राजेशाही थाटातील आयुष्य जगण्याला प्राधान्य देतो. तसं पाहायला गेलं तर बॉलिवूडचा हा सुलतान फार काही छंद वगैरे जोपासत असेल असं दिसत नाही. पण, साइकलिंग आणि पेंटिंग व्यतिरिक्त त्याची आणखी एक आवड आहे. ती म्हणजे प्राणी पाळण्याची.

एका वेबसाइटच्या माहितीनुसार सलमानकडे ‘माय सन’ आणि ‘माय जान’ नावाचे दोन कुत्रे होते. सध्याच्या घडीला हे दोन्ही कुत्रे त्याच्यासोबत नाहीत कारण, २०१६ मध्ये त्यांचं निधन झालं. हे दोन्ही कुत्रे सलमानच्या हृदयाच्या फार जवळचे होते. ‘बिग बॉस’च्या सेटवरही त्याने या कुत्र्यांना आणलं होतं. ‘माय सन’ आणि ‘माय जान’ यांनी मला धैर्य आणि स्वत:वर ताबा ठेवण्याची शिकवण दिली असं खुद्द सलमान म्हणतो. आपल्या सर्वात आवडत्या ‘माय सन’ आणि ‘माय जान’ यांच्या मृत्युनंतर त्याने लॅब्राडोर, सेंट बर्नाड आणि नेपोलिटन मस्टिफ या जातीचे कुत्रे पाळले.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

सहसा या प्रजातीच्या कुत्र्यांची किंमत २ लाखांपासून सुरु होते. या प्रत्येक कुत्र्यावर दरमहा जवळपास ५० हजार रुपये इतका खर्च होतो. सलमान आणि त्याच्या कुत्र्यांमध्ये असलेलं नातं ‘बजरंगी भाईजान’च्या चित्रीकरणाच्या वेळी पाहायला मिळालं होतं. त्या चित्रपटाच्या वेळी ‘सँडी’ नावाचा कुत्रा आजारी झाला होता. त्यावेळी चित्रपटाचं चित्रीकरण थांबवत त्याने थेट घरी धाव घेतली होती. सोशल मीडियावरही सलमान आणि त्याच्या या अनोख्या मित्रांचं नातं नेहमीच पाहायला मिळालं आहे.