सलमान खानचा आगामी ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाच या चित्रपटातील १४ मिनिटांची दृश्य वगळण्यात आली आहेत. एका अर्थी भाईजानच्या या चित्रपटावर कात्रीच चालली आहे. पण, ही कात्री सेन्सॉरची नाहीये हेसुद्धा तितकच खरं. सुरुवातीला २ तास ३५ मिनिटं इतक्या वेळामध्ये ‘ट्युबलाइट’चं कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होतं. पण, त्यानंतर मात्र या चित्रपटातील काही दृश्य वगळण्यात आली असून, २ तास १६ मिनिटांमध्येच हे कथानक आटोपतं घेण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहसा कबीर खानचे चित्रपट दोन तासांपेक्षा जास्त वेळ प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खिळवून ठेवतात. सलमान Salman Khan आणि कबीरच्या जोडीचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपटही जवळपास अडीच तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता. इतकी जास्त लांबी असूनही या चित्रपटावर प्रेक्षकांची काहीच हरकत नवहती. पण, ‘ट्युबलाइट’च्या अखेरच्या संकलनानंतर मात्र काही कारणास्तव या चित्रपटातील १४ मिनिटांची दृश्य कमी करण्यात आली आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेल्या सलमनच्या चित्रपटांमध्ये ‘ट्युबलाइट’ सर्वात कमी वेळ चालणारा चित्रपट ठरणार आहे. ‘सुलतान’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ हे चित्रपटही दोन- अडीच तासांपेक्षा जास्त वेळासाठी पडद्यावर चालले होते. तेव्हा आता ‘ट्युबलाइट’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पाहा : शबिना सलमानला आपल्या तालावर नाचवते तेव्हा…

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं विविध मार्गांनी प्रमोशन केलं जात आहे. त्यासाठी खुद्द सलमान खान आणि या चित्रपटातील त्याचे सहकलाकारही त्याला साथ देत आहेत. ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये १९६० च्या दशकातील काळ साकारण्यात आला असून, चित्रपटाचं बरंच चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आलं आहे. सलमानच्या या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेता सोहेल खानही स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या खान बंधूंचं ऑनस्क्रीन ‘भाईहूड’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करणार यात शंकाच नाही.