16 December 2017

News Flash

संजूबाबाच्या बायोपिकवर मान्यता नाराज, रणबीरशी संपर्काचा सातत्याने प्रयत्न

जाणून घ्या काय आहे यामागचं कारण

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 13, 2017 9:48 AM

रणबीर कपूर, मान्यता दत्त

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून, अभिनेता रणबीर कपूर आणि इतर सर्वच कलाकार चित्रीकरणात व्यग्र असल्याचं पाहायला मिळते आहे. या सर्व उत्साही वातावरणात संजूबाबाची पत्नी मान्यता काहीशी नाराज असल्याचे कळते. एका दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मान्यताला चित्रपटाविषयी कोणतीही विस्तृत माहिती दिली नसून, तिच्या भूमिकेविषयीसुद्धा तिला फार काही कळू दिले नाही. त्यामुळेच ती नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

रणबीर कपूरची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री दिया मिर्झा संजूबाबाच्या पत्नीची म्हणजेच मान्यताची भूमिका साकारणार असल्याचे कळते. त्यामुळे या चित्रपटाविषयी आणि त्यातील आपली भूमिका कशा प्रकारे साकारली जाणार आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी मान्यता चित्रपटाशी संलग्न व्यक्तींशी, रणबीरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मान्यतावर आधारित भूमिका चित्रपटात किती वेळासाठी दाखवण्यात येणार आहे, याविषयीसुद्धा तिला काहीच कल्पना देण्यात आलेली नसल्यामुळे ती नाराज आहे. संजय दत्तच्या आतापर्यंतच्या जीवनप्रवासावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार असून, त्यात रणबीर व्यतिरिक्त इतरही काही प्रसिद्ध चेहरे झळकणार आहेत. सोनम कपूर, अनुष्का शर्मा, मनिषा कोईराला, परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यातच ठेवलं असून इतरही बऱ्याच गोष्टींविषयी गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वातावरण निर्मितीमध्ये या सर्व गोष्टींचा फायदा होत असल्याचं पाहायला मिळते आहे.

First Published on October 13, 2017 9:48 am

Web Title: bollywood actor sanjay dutt upset wife maanyata has reportedly been calling actor ranbir kapoor