अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली होती. पण, दिग्दर्शक रामगोपाल वर्माने मात्र या चित्रपटाविषयी आपलं वेगळंच मत मांडलं.
‘सत्या’, ‘कंपनी’, ‘भूत’, ‘रात’ यांसारखे चित्रपट साकारणाऱ्या रामगोपाल वर्माने मात्र हिरानींचा संजू हा चित्रपट न आवडल्याचं स्पष्ट केलं होतं. किंबहुना त्याने संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आणखी एक बायोपिक साकारणार असल्याचं स्पष्ट केलं. रामगोपाल वर्माने घेतलेली ही जबाबदारी संजूबाबाच्या बहिणीला खटकली असल्याचं स्पष्ट होत आहे.

संजय दत्तच्या बहुचर्चित बायोपिकच्या माध्यमातून रामगोपाल वर्मा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांमध्ये असणारी त्याची भूमिका, एके56 प्रकरण या सर्व गोष्टींवरुन पडदा उचलणार असल्याचं सांगितलं होतं. ‘संजू: द रिअल स्टोरी’, असं या चित्रपटाचं शीर्षक असल्याचं कळत आहे. पण, रामूचा हा निर्णय दत्त कुटुंबियांना मात्र पटलेला दिसत नाही. याविषयीच ‘मिड डे’शी संवाद साधत नम्रता दत्त म्हणाली, ‘तो त्याच्या आयुष्यातील एक दुर्दैवी काळ होता. पण, आता मात्र भूतकाळातील सर्व गोष्टी त्याने मागेच सोडल्या आहेत. त्यामुळे मग आता वर्मा त्याच गोष्टींवर प्रकाश का टाकत आहेत ?’, असा प्रश्न तुने उपस्थित केला. संजय दत्तच्या कुटुंबियांना १९९३ साखळी बॉम्बस्फोटांच्या आरोपांमुळे बऱ्याच अडचणींचा सामन करावा लागला होता. त्यामुळे या विषयावर आधारित चित्रपट साकारला जाऊ नये, अशीच त्यांची इच्छा आहे.

‘संजयने या चित्रपला हिरवा कंदील दाखवला तर माझी काहीच हरकत नसेल. पण, तरीही तुम्हाला त्याच्या आयुष्यात इतका रस का आहे? पुन्हा एकदा ही मंडळी आम्हाला त्याच यातना का देत आहेत?, असा संतप्त प्रश्नही तिने उपस्थित केला.

वाचा : मध्यंतरातील संवाद

दरम्यान, आता यावर खुद्द रामगोपाल वर्मा काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला हा चित्रपट साकारणार असल्याचा निर्धार त्याने केला असून, त्याच्या स्टारकास्टवरुन मात्र पडदा उचलण्यात आलेला नाही.