कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी कोण, कसा आणि किती प्रयत्न करेल, याचा काहीच नेम नाही. त्यातच शाहरुख खानबद्दल काही जाणून घेण्याचा विषय निघाल्यावर अनेकांचच लक्ष त्या विषयाकडे एकवटतं. ‘टेड टॉक्स’मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चर्चेत आलेल्या शाहरुखच्या महाविद्यालयातील फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या ‘डीयू टाइम्स’ फेसबुक पेजवर किंग खानच्या अॅडमिशन फॉर्मचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. मुख्य म्हणजे या फॉर्ममध्ये नमूद केल्यानुसार इंग्रजी विषयात त्याला फक्त ५१ गुण मिळाले होते. जो किंग खान इतक्या सहजतेनं अस्खलित इंग्रजी बोलू शकतो. त्याला या विषयात इतके कमी गुण कसे, हीच चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचं पाहायला मिळतंय.

शाहरुखच्या महाविद्यालयाचा फॉर्म व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. पण, यावेळी मात्र ‘डीयू टाइम्स’च्या अधिकृत पेजवरुनच या फॉर्मचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. याविषयी सांगताना त्या पेजचा अॅडमिन मिल्हाज हुसैन म्हणाला, ‘तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष असेल आणि तुम्ही मेहनती असाल तर कोणत्याही विषयात मिळालेल्या कमी गुणांनी काहीच फरक पडत नाही. ही बाब लक्षात आणून देण्यासाठी हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

‘मुख्य म्हणजे या स्पर्धात्मक युगात अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी शाहरुखचा हा फॉर्म पोस्ट करण्यात आला आहे. एक कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्या एका गोष्टीमुळे आमच्या फेसबुक पेजकडे अधिकाधिक लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. पर्यायी कमी गुण, अपेक्षा आणि ध्येय या मुद्द्यांवरही तरुणाई चर्चा करत आहे’, असं मिल्हाज ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या माहितीत म्हणाला.
शाहरुखचा हा फॉर्म पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी तर किंग खानची खिल्लीही उडवली आहे. या सर्व प्रकारावर आता खुद्द शाहरुखची काय प्रतिक्रिया येते हे जाणून घेण्यासाठीची उत्सुकताही सध्या पाहायला मिळते आहे.