हिंदी चित्रपटसृष्टीत किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना सध्या भलतीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहाना सोशल मीडियावर तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत होतीच. त्यातच आता भर म्हणजे ‘वोग इंडिया’ या मासिकाच्या मुखपृष्टावरही तिचं सुरेख असं छायाचित्र छापण्यात आलं आहे. खुद्द शाहरुखही यामुळे आनंदात असून, त्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून हा आनंद व्यक्त केला.

सुहाना सध्या शिक्षण घेत असून, ती नेमकी वोगच्या मुखपृष्टावर कोणत्या कारणामुळे झळकली असा प्रश् काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला. तर, घराणेशाहीचंच हे उदाहरण आहे, असं म्हणतही काहींनी तिच्यावर टीका केली. सोशल मीडियावर या मुद्द्यामुळे तिची खिल्लीही उडवण्यात आली. याविषयीच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, ‘घरी सर्व गोष्टी सुरळीत असतात. पण, बाहेर मात्र परिस्थिती वेगळी आहे. माझ्यापुढे काही आव्हानं आहेत. मला आताही या गोष्टी हाताळणं कठीण वाटतं. कारण, लोक प्रत्येकवेळी तुमच्याकडे पाहतात ते काही निष्कर्ष काढण्यासाठीच. हे सर्व सोशल मीडियावर जास्त प्रमाणात आढळतं.’

आपण सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाणावर असल्याचं म्हणत खासगी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही फोटो लीक होत असल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं. तुमच्याविषयी असंख्य लोक चर्चा करत असतात. ते तुम्हाला ओळखत नाहीत, ते नेमकं काय बोलत आहेत अनेकदा तर त्याचीही त्यांना कल्पना नसते. पण, तरीही ते नुसतंच बोलत असतात. या सर्व गोष्टींचा आत्मविश्वासावर बऱ्याचदा परिणाम होतो, असं म्हणत सुहानाने महत्त्वपूर्ण मुद्दा अधोरेखित केला. अनेकदा आपण कितीही प्रयत्न केला तरीही या सर्व गोष्टींचा परिणाम होतोच, असं म्हणत निंदा करणारे ते करणं सुरु ठेवणारच, आपण फक्त त्याने खचून न जाण्याचाच मंत्र अवलंबल्याचं स्पष्ट केलं.

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

माध्यमांशी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर साधलेला संवाद आणि सोशल मीडिया ट्रोलिंगविषयी दिलेली प्रतिक्रिया पाहता एका अर्थी सुहाना या कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी तयार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आपलं शिक्षण पूर्ण करुन किंग खानची ही लेक आता नेमकी कोणत्या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करते, की मॉडेलिंगच्या वाटेवर जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.