दिग्दर्शक आनंद एल रायच्या आगामी चित्रपटात शाहरुख काम करत असल्याचे साऱ्यांनाच माहित होते. पण चित्रपटाचे नाव निश्चित झाले नव्हते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव तर जाहीर केलेच शिवाय चित्रपटाचा टीझरही सर्वांच्या भेटीला आणला. ‘झिरो’ असे चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाची चर्चा फार आधीपासूनच रंगत होती. सोशल मीडियावर चित्रपटाच्या नावाचे अनेक मीम्स पाहायला मिळाले. ज्या ट्विटच्या माध्यमातून शाहरुखने ‘झिरो’ सर्वांच्या समोर आणला होता ते ट्विट दुसऱ्याचेच असल्याचे म्हणत त्या व्यक्तीला ट्विटचे श्रेय देण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

मिथिलेश बरिया या ट्विटर युजरने ‘टिकेटें लेकर बैठें हैं मेरी जिंन्दगी की कुछ लोग…. तमाशा भी भरपूर होना चाहिए’, अशी ओळ लिहित २०१५ मध्ये एक ट्विट केले होते. शाहरुखने त्याच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटाचा टीझर पोस्ट करताना केलेल्या ट्विटमध्येही हीच ओळ वापरली. त्यावेळी बरिया यांच्या संपर्कात असणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेचच ही गोष्ट इतरांच्या निदर्शनास आणून देत शाहरुखकडे ट्विटचा योग्य मोबदला मागितला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा प्रकाशझोतात आल्यामुळे बरिया यांना त्यांच्या ट्विटचे श्रेय आणि मोबदला मिळावा असे मत अनेक नेटकऱ्यांनीही मांडले आहे. आनंद एल.राय दिग्दर्शित या चित्रपटातून शाहरुख एका बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘झिरो’मध्ये त्याच्यासोबतच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफही दिसणार आहेत.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल