चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवातीच्या काळात कोणत्याही कलाकाराच्या वाट्याला इतक्या सहजासहजी यश आलेलं नाही. काही कलाकारांनी तर अथक परिश्रमांनंतर यशाची गोडी चाखली आहे. अशाच कलारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी.

चित्रपटसृष्टीत कोणाचाही वरदहस्त नसणाऱ्या सुनील शेट्टीला सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या होत्या. त्यातही त्याच्या नावापुढे कोणतंही प्रसिद्ध आडनाव किंवा कोणाचा वशिला लावण्याची सोय नव्हती. पण, आलेल्या परिस्थितीवर मात करत सुनीलने स्वत:ची ओळख प्रस्थापित केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१६ मध्ये त्याने एक पोर्टलही सुरु केलं ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कलाकारांसाठी त्याने रोजगाराच्या योग्य संधी उपलब्ध करुन दिल्या. सध्या सुनीलचा हाच वारसा पुढे चालवत त्याची मुलगी अथिया शेट्टी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान भक्कम करु पाहात आहे.

अथिया जरी स्वत:च्या बळावर चित्रपटसृष्टीत ओळख बनवू पाहात असली तरीही तिच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्यांच्या नजरा खिळल्या असणार यात शंकाच नाही. याविषयीच सांगताना सुनील शेट्टी म्हणाला, ‘मी सर्वांना समान वागणूक देतो. माझ्या मुलीचा पहिला चित्रपट प्रदर्शित होऊन गेला खरा. पण, तिचा दुसरा चित्रपट हा सर्वस्वी तिच्या ताकदीच्या आणि कौशल्याच्या बळावर तिला मिळाला आहे. मी स्वत: खूप कष्ट केले आहेत आणि जर माझ्या नावाचा फायदा माझ्या मुलांना होत असेल तर त्यात गैर काय?’ असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

‘बरेचजण आपल्या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतात. राजकारण्यांची मुलं राजकारणात प्रवेश करतात, एखाद्या कंपनीच्या मालकाची मुलं त्याच वाटेवर जातात, तर मग या साऱ्यातून चित्रपसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना का वेगळं काढलं जातंय?’ असं म्हणत सुनीलने त्याचे विचार मांडले. घराणेशाहीच्या मुद्द्याचा विषय उगाचच चघळत बसण्यापेक्षा त्यावर पडदा टाकून नव्या जोमाच्या कलाकारांना, तरुणाईला प्रोत्साहन देण्यास आणि त्यांच्या कलागुणांचं स्वागत करण्यास सुरुवात केली पाहिजे, असं ठाम मतही त्याने मांडलं.

सुनील शेट्टी नेहमीच नवोदित कलाकारांसाठी एक आदर्श ठरला आहे. त्याची आतापर्यंतची कारकीर्दही बऱ्याचजणांसाठी प्रोत्साहनपर ठरली आहे. त्यामुळे त्याच्या या मताचा आता कितीजण गांभीर्यानं विचार करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.