छोट्या पडद्यावर पवित्र रिश्ता, तर रुपेरी पडद्यावर काय पो चे या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी(१४ जून) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील घरी त्याने गळफास लावून त्याच्या आयुष्याचा अंत केला. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्याने उराशी अनेक स्वप्नं बाळगली होती. २०१९मध्ये त्याने त्यांच्या स्वप्नांची एक यादीही सोशल मीडियावर शेअर केली होती. या यादीत त्याने त्याच्या ५० स्वप्नांविषयी लिहिलं होतं. सुशांत सिंगची स्वप्नही अशीच होती जी पूर्ण होणे स्वत: मध्ये खूपच रंजक होतं. त्यानं दोन वर्षांपूर्वी चंद्रावरही जमिन विकत घेतली होती. अनेक जण हे ऐकून चकित होऊ शकतात. पण हे सत्य आहे.

सुशांतनं २०१८ मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्याचा हा प्लॉट ‘सी ऑफ मसकोव्ही’मध्ये आहे. इंटरनॅशल लूनर लँड्स रजिस्ट्रीकडून त्यानं ती जमीन खरेदी केली होती. तसंच त्यावर नजर ठेवण्यासाठी त्यानं एक टेलिस्कोपही खरेदी केला होती. त्याच्याकडे 14LX00 हा अॅडव्हान्स टेलिस्कोपही होता.

दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय संघटनांच्या म्हणण्यानुसार चंद्रावरील जमिनीवर कोणीही कायदेशीर हक्क दाखवू शकत नाही. ती जमीन पृथ्वीच्या बाहेर आहे आणि त्यावर कोणताही एक देशही ताबा मिळवू शकत नाही, असंही सांगण्यात आलं होतं. याबद्दल बोलताना सुशांतने एका मुलाखतीत सांगितलं होतं की “मी असं मानत आलोय की आपण ज्या निरनिराळ्या मार्गांनी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ती शेवटी प्रश्नांची उत्तरंच आहेत. त्याच प्रकारे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करतो तेव्हा नंतर ते वास्तवात साकारलं जातं. माझी आई म्हणायची की माझं आयुष्य एक कथा असेल जी मी स्वत:च कथन करेन. आज मी चंद्रावर जाण्याबद्दल बोलत आहे आणि मी चंद्रावर आहे.”

सुशांतची होती ही ड्रीमलिस्ट

विमान चालविण्याचं प्रशिक्षण, आयर्नमॅन ट्रायथलॉनचं ( स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणे, जंगलात एक आठवडा रहाणं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं, जवळपास १० नृत्यप्रकार शिकणं, शेती करणं शिकणं, आवडती ५० गाणी गिटारवर वाजवायची होती, एका लॅम्बोर्गिनीचं मालक होणं, स्वामी विवेकानंदांवर आधारित डॉक्युमेंट्री तयार करणं, क्रिकेट खेळणं, मार्स कोड( टेलिकम्युनिकेशन लॅग्वेंज) शिकणं,अंतराळाविषयीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक विद्यार्थ्यांना शिकवणं, चार टाळ्या वाजून करण्याची पुशअप्स स्टाइल, एक हजार वृक्षारोपण करणं, दिल्लीतील कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक संध्याकाळ व्यतीत करणं, कैलाश पर्वतावर बसून ध्यानधारणा करणं, एक पुस्तक लिहिणं, सहा महिन्यात सिक्स पॅक अॅब्ज करणं,अशी अनेक स्वप्न सुशांतला पूर्ण करायची होती.