‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला आहे. ‘काय पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर त्याच्या करिअरला चांगलीच गती मिळाली. इथे मालिकेमुळे त्याला मिळालेल्या लोकप्रियतेची मदत झाली ही बाब नाकारता येणार नाही. पहिल्या चित्रपटानंतर सुशांच्या यशाचा गाडा वेगाने चालू लागला आणि महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर साकारलेल्या ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाने त्याच्या करिअरला कलाटणी दिली. क्रीडा विश्वातील एका प्रसिद्ध खेळाडूची व्यक्तिरेखा यशस्वीपणे निभावणाऱ्या सुशांतच्या वाट्याला आता आणखी एका खेळाडूची भूमिका आली आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार फ्रिस्टाईल रेसलिंग खेळाडू दलिप सिंग राणा म्हणजेच ‘द ग्रेट खली’च्या भूमिकेसाठी सुशांतच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डब्ल्यू डब्ल्यू इ’मध्ये ‘द ग्रेट खली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दलिप सिंग राणाच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यात येणार आहे. त्यासाठीचे हक्क मिळवण्यासाठी खलीकडे विचारणा करण्यात आली असून, त्याने आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याची परवानगी निर्मिती संस्थेला दिली आहे. त्यासाठी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसमोरही प्रस्ताव ठेवला असून, ही भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडून सकारात्मक उत्तर येईल, अशा अपेक्षा आहेत.

https://www.instagram.com/p/BZNgyHZgE_h/

https://www.instagram.com/p/BXh7_0UAXZJ/

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

अवाढव्य शरीरामुळे ओळखल्या जाणाऱ्या खलीच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी अद्यापही कोणाला ठाऊक नाहीत. त्यामुळे त्या सर्व गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. पंजाब पोलीसमध्ये खली कार्यरत होता. फ्रिस्टाईल रेसलिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला होता. त्याचा हाच संघर्ष चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. खलीची एकंदर शरीरयष्टी पाहता ही भूमिका साकारण्यासाठी सुशांतला बरीच मेहनत करावी लागणार हे खरं. त्यामुळे आता खलीची भूमिका साकारण्यासाठीच्या प्रस्तावावर सुशांतचा काय निर्णय असणार आणि जर या भूमिकेसाठी तो कशा प्रकारे तयारी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.