ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना शुक्रवारी रात्री शरीरातले पाणी कमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गिरगावच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. विनोद खन्ना यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे वृत्त अनेक माध्यमांमधून मिळत असले तरी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप कळली नाही. विनोद खन्ना यांचा रुग्णालयातला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांच्या खंगलेल्या तब्येतीकडे बघून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वडिलांची तब्येत आता बरी असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी नेण्यात येईल, असे विनोद खन्ना यांचा मुलगा राहुलने प्रसारमाध्यमांना सांगितले. तसंच राहुलने रुग्णालयाचे आभार मानले. ‘मी रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा खूप आभारी आहे. त्यांनी बाबांची खूप चांगली काळजी घेतली. याशिवाय रुग्णालयानेही, विनोद खन्ना यांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत आहे आणि लवकरच त्यांना घरी जाण्याची परवानगीही देऊ,’ असे म्हटले होते.

विनोद खन्ना
विनोद खन्ना

विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा अनेक सिनेमात काम केले. विनोद यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात खलनायक म्हणून झाली पण नंतर मात्र त्यांनी ‘हिरो’ म्हणूनच अनेकांच्या मनावर आपली छाप पाडली.

विनोद खन्ना यांनी १९७१ मध्ये ‘हम तुम और वो’ या सिनेमातून पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. याशिवाय राजकारणातही त्यांनी आपले योगदान दिले. सध्या ते पंजाबमधील गुरदासपुर येथून भाजपचे खासदार आहेत.