|| रेश्मा राईकवार

निवडणुकांचा रंग चढायला लागला, की राजकारण आणि चित्रपटसृष्टीचे प्रवाह जणू एक होतात. कलाकारांची लोकप्रियता, त्यांची प्रतिमा यांचा वापर करून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवायचे हा राजकारण्यांचा फंडा तर आपल्याच जनमानसातील लोकप्रियतेचा वापर करत राजकीय फायदा पदरात पाडून घेण्यासाठी कलाकारांची एकच लगबग सुरू होते. बॉलीवूडमध्ये जुन्याजाणत्या अभिनेत्यांची एक फळीच्या फळी राजकारणात उतरली होती, त्यांच्यापैकी काही जण यशस्वीही झाले आणि राजकारणात सक्रियही झाले होते, आजही आहेत. तरी आमिर खान, सलमान खान, शाहरूख खान, अजय देवगण, अक्षय कुमार या आघाडीच्या कलाकारांपासून ते आत्ताच्या रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा या फळीने आजवर राजकारणापासून लांबच राहणे पसंत केले. मात्र असे असले तरीही बॉलीवूडच्या राजकारणाचा अंक निश्चितपणे बदलत चाललाय..

कलाकारांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून राजकारणाचा रंग लावणे ही नवीन गोष्ट उरलेली नाही. राजकोरणातील सक्रिय कलाकारांचा भलामोठा वारसा बॉलीवूडला आहे. तुलनेने दक्षिणेकडे तो अधिक भरभक्कम आहे, तर मराठी कलाकारांची तुलनाच होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. अगदी पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते थेट राजकारणात न उतरता समाजवादी विचारांना धरून राहत आपल्या चित्रपटांमधून त्या विषयांवर भाष्य करण्यात तत्कालीन कलाकार, दिग्दर्शक आघाडीवर होते. पन्नासच्या दशकात पुढारलेल्या विचारांचे कलाकार, दिग्दर्शक यांची एकच लाट हिंदी चित्रपटसृष्टीत आली. त्यांच्यापैकी अनेकांवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. काही डाव्या विचारसरणीला पाठिंबा देणारे होते, तर काहींनी त्या वेळी काँग्रेस पक्षाबरोबर नाळ जोडून घेतली होती.

तरीही तुलनेने थेट राजकारणात उतरून आपला कार्यविस्तार वाढवण्याचा प्रयत्न करणारे फार कमी होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि तेथील कलाकार मात्र राजकारणापासून दूर राहिले नाहीत. सी. एन. अन्नादोराई, एन. जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, एन. टी. रामाराव, जयललिता, चिरंजीवी ते अगदी आता अभिनेता कमल हसनने स्थापन केलेल्या मक्कल निधी मयम या नव्या पक्षापर्यंत भलामोठा इतिहास आहे. बॉलीवूडलाही राजकारणाचा रंग लागलाच नाही, असं नाही. राजेश खन्ना, सुनील दत्त, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, जयाप्रदा ही सगळीच मंडळी थेट राजकारणात उतरली. आपापल्या पद्धतीने निवडणुका लढवल्या, काही राजकारणात यशस्वी ठरले, तर अमिताभ बच्चनसारख्या महानायकाला मोठा धडा घेत राजकारणापासून दूर व्हावे लागले. हा सगळा भाग लक्षात घेण्याचे कारण म्हणजे त्यानंतर आलेल्या कलाकारांनी मात्र थेट राजकारणात उतरणे कायम टाळले. किंबहुना, अनेकदा संवेदनशील विषयांवर व्यक्त होणे, राजकारणाबद्दल आपले विचार मांडणे यापासूनही ही मंडळी कायम दूर राहिली; पण हा दुरावा २०१४ च्या निवडणुकांपासून कमी होत गेलाय. या निवडणुकांमध्ये तर बॉलीवूडच्या अगदी तरुण फळीलाही लोकांना मतदानासाठी प्रेरित करा, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे गेल्या काही दशकांमधला हा दुरावा आता सलोख्यात रूपांतरित होतोय असे चित्र निर्माण होते आहे. यासाठी एका अर्थी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची या कलाकारांना वेगवेगळ्या उपक्रमांतून सरकारशी जोडून घेण्याची योजना कारणीभूत ठरली, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अभिनेत्री किरण खेर, परेश रावल, गुल पनाग, मनोज तिवारी, प्रकाश झा, बप्पी लहिरी, राखी सावंत अशी अनेक कलाकार मंडळी राजकारणात उतरली. त्यापैकी किरण खेर, परेश रावल आणि मनोज तिवारी हे तिघेही निवडून आले. त्याच वेळी अभिनेता अनुपम खेर हेही अप्रत्यक्षरीत्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत ‘अच्छे दिन आ गये’चा नारा लगावला. परिणामी, राजकारणाचे वारे चित्रपटसृष्टीत थोडे वेगाने वाहू लागले. यंदाही शिल्पा शिंदे, इशा कोप्पीकर, मौशुमी चटर्जी, सोना मोहपात्रा, बिस्वजीत चटर्जी अशी मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. गेल्या दोन वर्षांत चित्रपट माध्यमांतून सरकारी योजनांचा बऱ्यापैकी प्रसार झाला. शिवाय, नरेंद्र मोदी यांनी कलाकारांनाच स्वच्छ भारत मोहीम पुढे नेण्याचे आवाहन केल्याने अमिताभ बच्चन, सलमान खान, अलिया भट्ट अशी अनेक नव्या-जुन्या कलाकारांची फौज प्रत्यक्ष सामाजिक कार्यात उतरली. अभिनेता अक्षयकुमारही थेट राजकारणात उतरला नसला तरी नानाविध प्रकारे त्याने सरकारी योजनांमधून आपला सहभाग नोंदवला आहे. त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’सारख्या चित्रपटांनी त्याची जनमानसांतही सामाजिक कार्यात रमणारा अभिनेता अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रश्नांवर व्यक्त न होणारी ही मंडळी अगदी चित्रपटसृष्टीच्या ‘जीएसटी’सह नानाविध समस्यांसाठी थेट पंतप्रधानांना जाऊन भेटली. त्यानंतर लगोलग करण जोहर, विकी कौशल, रणबीर कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग, अश्विनी अय्यर, अलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, राजकुमार राव अशी सगळी तरुण कलाकार मंडळी पंतप्रधानांना भेटली. इतकंच नाही त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने, आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीची छायाचित्रे आणि वर्णनेही लोकांपर्यंत पोहोचवली.

सध्या एकामागोमाग प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’सारखे चित्रपट आणि लवकरच प्रदर्शित होणारा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चरित्रपट, इरॉस नाऊवर येऊ घातलेली मोदींचीच कथा सांगणारी उमेश शुक्ला दिग्दर्शित वेबसीरिज, ‘माय नेम इज रागा’ हा रुपेश पौल दिग्दर्शित आगामी चित्रपट या सगळ्यामुळे चित्रपटसृष्टीत शिरलेले राजकारणाचे वारे भव्य रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर धडकलेले पाहायला मिळताहेत. उरी हल्ला ते एअर स्ट्राइकसारख्या घटना, सामाजिक कार्यातला सहभाग, चित्रपट उद्योगाच्या अडचणींवर सरकारकडून मिळालेले मदतीचे आश्वासन, सोशल मीडियामुळे नेत्यांशी होणारा थेट संवाद आणि निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सातत्याने होणारे बदल या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून की काय, कलाकारांनी राजकारणाशी आजवर राखलेले अंतर हळूहळू कमी होत चालल्याचे दिसून येते आहे. येत्या काळात आणखी काही तरुण आघाडीचे कलाकार थेट राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले तर त्यात नवल नाही; पण बॉलीवूडच्या राजकारणाचा अंक निश्चितपणे बदलत चाललाय!