बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनाने अद्यापही बॉलिवूड सावरलेलं नाही. सुपरस्टार असणाऱ्या बॉलिवूडमध्ये इरफान खान यांनी आपली एक अभिनेता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. इरफान खान यांच्याप्रमाणेच मनोज वाजपेयी यांनाही एक उत्तम कसलेला अभिनेता म्हणून ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा इरफान खान आणि मनोज वाजपेयी एकाच भूमिकेसाठी समोरासमोर आले होते. ही सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा दोघेही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते.

मनोज वाजपेयीने Lallantop  ला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितलं होता. झालं असं होतं की, रामगोपाल वर्मा ‘दौड’ चित्रपटात परेश रावल यांचा ‘राइट हॅण्ड’ भूमिकेसाठी शोध घेत होते. दौड चित्रपट लिहिण्याची जबाबदारी असणाऱ्या कनन अय्यर यांनी मनोज वाजपेयीला रामगोपाल वर्माला भेटण्यासाठी येण्यास सांगितलं होतं. सोबत इरफान खान आणि विनीत कुमार यांनाही बोलावलं होतं.

यावेळी त्यांनी मनोज वाजपेयीला हेदेखील सांगितलं होतं की, रामगोपाल वर्माला जर एखादा अभिनेता आवडला तर तो मोठा रोलही देऊ शकतो. मनोज वाजपेयीने पैसे किती मिळणार विचारलं असता ३५ हजार मिळतील असं सांगितलं. मनोज वाजपेयीनेही काही महिन्यांसाठी घऱाचं भाडं देण्याइतके पैसे मिळत असल्याने भेटण्याची तयारी दर्शवली. मनोज वाजपेयी ऑफिसात पोहोचले तेव्हा इरफान खान आणि विनीत कुमार आधीच तिथे पोहोचले होते. दोघांशी बोलून झाल्यानंतर त्यांना सांगतो सांगून पाठवलं.

मनोज वाजपेयीचा नंबर आला तेव्हा रामगोपाल वर्माने काय काय काम केलं आहे याबद्दल चौकशी केली. मनोज वाजपेयीने  ‘बॅण्डिट क्वीन’ चित्रपटात काम केलं आहे सांगितल्यानंतर रामगोपाल वर्मा एकदम आश्चर्यचकित झाला. मी दोन वेळा चित्रपट पाहिला आहे, तू कोणती भूमिका केली आहेस असं त्याने विचारलं. मनोज वाजपेयीने ‘डाकू मानसिंग’ची भूमिका सांगताच रामगोपाल वर्माचा विश्वासच बसेनासा झाला. मी गेल्या पाच वर्षांपासून तुला शोधतोय, पण मला कोणीही तुझा नंबर, माहिती देत नव्हतं असं सांगितल्यावर मनोज वाजपेयीचाही विश्वास बसेना. कारण गेल्या पाच वर्षात त्याच्या भूमिकेचं एका व्यक्तीनेही कौतुक केलं नव्हतं. सोबतच त्याच्यासोबत चित्रपटात असणाऱ्या सगळ्यांना कामं मिळाली होती. पण मनोज वाजपेयीला पाच वर्षात एकानेही काम दिलं नाही.

रामगोपाल वर्माने यावेळी मनोज वाजपेयींना हा खूप छोटा रोल असून मी एक मोठा चित्रपट करणार असून त्यात तुला मोठी भूमिका देतो असं सांगितलं. संघर्षाचे दिवस असल्याने मनोज वाजपेयी यांना आधीच आश्वासनांचा कंटाळा आला होता. त्यामुळे त्यांनी मला ही भूमिकापण करु द्या अशी विनंती केली. त्यावर रामगोपाल वर्मानेही ठीक आहे विश्वास नसेल तर कर असं म्हटलं. पण माझ्या पुढच्या चित्रपटात तुला मोठी भूमिका मिळणार हे नक्की आहे असं आश्वासन दिलं. त्यानंतर रामगोपाल वर्माने सत्या चित्रपटाची तयारी सुरु केली आणि त्यामध्ये मनोज वाजपेयी यांना भिकू म्हात्रेची भूमिका दिली. ही भूमिका मुख्य भूमिकेपेक्षाही जास्त प्रसिद्ध झाली आणि मनोज वाजपेयी नावाची बॉलिवूडला ओळख झाली.