लग्नसोहळा म्हटलं की घाई-गडबड होणे अपेक्षित असतच. पाहुण्यांची गर्दी, प्रथा, परंपरा, प्रत्येकाच्या समजुती या साऱ्यामध्ये लग्नसोहळ्याची रंगत आणखीनच वाढते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा विवाहसोहळासुद्धा असाच रंगल्याचे पाहायला मिळाले. सध्या त्यांच्या या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळते आहे.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिढाईन केलेल्या खास कपड्यांपासून ते अगदी इटलीतील प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये विवाहसोहळ्याच्या धामधुमीपर्यंत सगळीकडेच आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या लग्नसोहळ्यामध्ये पाहुण्यांसाठी काही खास पदार्थांची मेजवानीही ठेवण्यात आली होती. विराट-अनुष्काचं लग्न म्हटल्यावर मेजवानीत असणारे पदार्थही खास असणार यात वादच नाही. ‘विरुष्का’च्या या लग्नासाठी जेवण आणि संपूर्ण मेजवानीची जबाबदारी शेफ रितू दालमियाच्या खांद्यांवर होती, असे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ने प्रसिद्ध केले आहे.

वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसमारंभासाठी मिलान येथील रितूच्या Cittamani रेस्तराँमधील काही खास पदार्थांची निवड लग्नाच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत करण्यात आली होती. त्यांच्या लग्नात दक्षिण आणि उत्तर भारतीय पदार्थांची रेलचेल होती. ज्यामध्ये बिकानेरी रोटीमध्ये रोल केलेला पोर्किनी मश्रूम, पनीर कुरचन, रॅविओली पास्ता असे पदार्थ ठेवण्यात आले होते. तर, गोडाच्या पदार्थांणध्ये रबडीही आवर्जून ठेवण्यात आली होती. त्याशिवाय पारंपरिक इटालियन चवीचे पदार्थही पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले होते. एकंदरच, भारतीय आणि इटालियन चवीच्या काही निवडक पदार्थांची मेजवानी ‘विरुष्का’च्या लग्न सोहळ्यात देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.