माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने गावसकर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचं म्हटलं आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करताना अनुष्काने म्हटलं आहे की, “खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”.

आणखी वाचा- अर्थाचा अनर्थ: विराट-अनुष्कावरून गावसकरांवर नेटकऱ्यांचा टीकेचा भडिमार, नक्की काय म्हणाले गावसकर

पुढे तिने म्हटलं आहे की, “मला खात्री आहे की माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करताना तुमच्याकडे इतर पर्यायी शब्द किंवा वाक्य उपलब्ध असतील. की त्यात माझं नाव जोडताना ते मर्यादित राहतात”.

“हे २०२० असून गोष्टी अद्यापही बदललेल्या नाहीत. क्रिकेटमध्ये माझं नाव ओढलं जाणं कधी बंद होईल?,” अशी खंत अनुष्काने व्यक्त केली आहे. शेवटी तिने लिहिलं आहे की, “आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही एक महान खेळाडू असून जेंटलमनच्या या खेळात तुमचं नाव नेहमी उंचावर असेल. पण तुम्ही काय बोललात हे कळल्यानंतर मला काय वाटतं ते सांगण्याची इच्छा होती”.

आणखी वाचा- BLOG : समालोचकांवर ‘ट्रोल’धाड

नेमकं काय झालं?
२४ सप्टेंबर २०२० रोजी पंजाबविरोधातील सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणावेळी त्याने राहुलचे दोन झेल सोडले तर फलंदाजी करताना अपयशी ठरला. कोहली फक्त एक धाव काढून शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेसी फलंदाजी करण्यात अपयश आलं. यावेळी भारताचे माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या अपयशाचा समाचार घेताना म्हटलं की, “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने”. तर, “इन्होंने लॉकडाउनमे तो बस अनुष्काकी गेंदों की प्रॅक्टिस की है” असं न बोललेलं वाक्य गावसकरांच्या तोंडी घालत टीकेचा भडिमार केला आहे.