बॉलिवूड आणि क्रीडा वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगते आहे. ती गोष्ट म्हणजे विराट- अनुष्काचे लग्न. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता विवाहबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र त्यांच्याविषयी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळते आहे. पण, खरंच ते लग्न करणार का, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आपल्या रिलेशनशिपविषयी बऱ्याचदा खुलेपणाने बोलणाऱ्या ‘विरुष्का’ने त्यांच्या आयुष्यातील इतका मोठा निर्णय उघड न करणं अनेकांनाच पेचात पाडणारं आहे.

बहुधा फार गाजावाजा न करता सर्वसामान्यांप्रमाणेच छोटेखानी विवाह सोहळ्याला या दोघांनीही प्राधान्य दिले असावे. कारण, अनुष्काने एका मुलाखतीदरम्यान लग्नाविषयीचे तिचे विचार मांडताना आपल्याला साधेपणाने विवाह करायचा असल्याचे सांगितले होते. ‘पिंकव्हिला’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अनुष्काला तिच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देत ती म्हणाली, ‘अर्थात मला लग्न करायचे आहे. मलाही वाटते की माझे कुटुंब असावे. एक अभिनेत्री असले तरीही सर्वसामान्य आयुष्य जगण्यालाच मी नेहमी प्राधान्य देत आले आहे. माझ्या मते लग्न हे तेव्हाच होईल, जेव्हा त्याची योग्य वेळ आली असेल. मी तेव्हाच लग्न करण्याचा निर्णय घेईन, जेव्हा मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असेन. एका दुसऱ्या व्यक्तीसोबत तुमचे आयुष्य व्यतीत करण्याचा तो निर्णय मानसिक स्थैर्य असतानाच घेणे योग्य असते. मुख्य म्हणजे त्या परिस्थितीमध्ये दोघांनीही मानसिकदृष्ट्या त्या निर्णयासाठी सक्षम असणे गरजेचे आहे.’

लग्न, कुटुंब, तडजोड, मुलंबाळं यासर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्याविषयीच सांगताना अनुष्का म्हणाली, ‘मला लोकांचा दृष्टीकोनच कळत नाही. लग्न ही काही थट्टा- मस्करी नाही.’ त्यातही नातवंडांसाठीची अपेक्षा वगैरै करणे ही सर्व स्वार्थीपणाचे लक्ष असल्याचे अनुष्काचे मत आहे. यासाठी तिने अभिनेत्री राणी मुखर्जीचे उदाहरण दिले. ‘राणी मुखर्जीने लग्न केले तेव्हा कोणालाच त्याविषयीची माहिती नव्हती’, असे अनुष्का त्या मुलाखतीत म्हणाली होती.

या मुलाखतीदरम्यान, अनुष्काने आपल्या आई वडिलांविषयीही मत मांडले. त्यांनी कधीही मला लग्नाविषयी विचारलेले नाही. किंबहुना माझ्या कुटुंबातील कोणीही कधीच माझ्या लग्नाविषयी विचारलेले नाही. एका छोट्या खेड्यातून असूनही माझे आई- वडील आधुनिक विचारसरणीचे आहेत. त्यामुळे इतरांनीही कधी त्यांना आमच्या (माझ्या आणि भावाच्या) लग्नाविषयी विचारले तर, ते त्यांचे आयुष्य आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, असे ते दोघंही सांगायचे, असेही अनुष्का म्हणाली होती.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

लग्नाविषयीची तिची एकूण मतं आणि सध्याची परिस्थिती पाहता इटलीला ती विराटसोबत विवाहबंधनात अडकेल, याची शक्यता नाकारता येत नाही. राणी मुखर्जीचे उदाहरण देणारी अनुष्का तिच्या लग्नाविषयीसुद्धा गोपनीयता पाळत अगदी छोटेखानी विवाहसोहळ्यात विराटसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार का, हाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तेव्हा आता अनुष्का आणि विराटच्या नात्याचा पुढचा टप्पा नेमका काय असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.