अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. जेट एअरवेजसोबतच्या वादामुळे ते दोघे चर्चेत आले आहेत. सनी आणि डॅनिअलने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत जेट एअरवेजमध्ये झालेल्या असुविधेबद्दल तक्रार केली. या आठवड्यात जेट एअरवेजने प्रवास करत असताना चारवेळा विमान उड्डाणास विलंब झाला. त्यामुळे आपली गैरसोय झाल्याचे तिने सांगितले.

सनीने याविषयीच एक ट्विट करत त्यात जेट एअरवेजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा उल्लेख करत आपल्या तक्रारीकडे त्यांचे लक्ष वेधले. ‘जेट एअरवेजच्या फ्लाइट्सना दररोज उशीर होतोय. मी जवळपास आठवडाभर प्रवास करत होते. पण, जेव्हा जेव्हा मी जेट एअरवेजने प्रवास केला तेव्हा तेव्हा विमानाच्या उड्डाणाच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल करण्यात आले. यामुळे माझी झोपच उडाली, या साऱ्यावर काहीतरी तोडगा निघालाच पाहिजे’, असे ट्विट करत सनीने आपली नाराजी व्यक्त केली.

वाचा : व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या…

तिच्या या ट्विटनंतर काही वेळाने पती डॅनिअलने एक ट्विट केले. ज्यामध्ये त्याने म्हटले, ‘आज सकाळी जेट एअरवेज विरोधात तक्रार केल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांचा मला फोन केला. विमानतळावरील कारभारामुळे विमान सुटण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अत्यंत चांगले उत्तर दिले…’ असे उपरोधिक ट्विट करत डॅनिअलने जेट एअरवेजचा कारभार सर्वांसमोर आणला. पण, जेट एअरवेजकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. फक्त सनीच नव्हे तर, बऱ्याच प्रवाशांनीही अशा अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता जेट एअरवेजचे प्रशासन याबाबत ठोस पावले उचलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.