चित्रपटसृष्टी किंवा एकंदर संपूर्ण कलाविश्लवात कधी कोणत्या कलाकाराच्या वाट्याला प्रसिद्धी येईल याचा काहीच नेम नसतो. पण, प्रसिद्धीझोतात आलेल्या कलाकारांना चाहत्यांचं प्रेम मिळत राहिलच याविषयीसुद्धा ठामपणे काहीच सांगता येत नाही. मुख्य म्हणजे कलाविश्वात बऱ्याच गोष्टींबाबत अनिश्चितता असते आणि याचाच प्रत्यय अभिनेत्री चित्रांगदा सिंहला आल्याचं पाहायला मिळत आहे. किंबहुना आपल्या एका निर्णयामुळे करिअरमध्ये हे अनपेक्षित वळण आल्याचं तिने स्पष्ट केलं.

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चित्रपटसृष्टीपासून दीर्घकाळ दूर राहिल्याचा आपल्या करिअरवर परिणाम झाल्याची प्रतिक्रिया खुद्द चित्रांगदानेच दिली आहे. ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’ या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या चित्रांगदाने आपल्या कारकिर्दीविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. याविषयीच सांगत ती म्हणाली, ‘या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये माझ्या आयुष्यात काही गोष्टी बदलल्या ज्यामुळे काही गोष्टींना माझ्याकडून जास्त महत्त्वं दिलं गेलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर जवळपास चार वर्षे मी या क्षेत्रापासून दूर राहिले. मी पुन्हा या क्षेत्रात आले आणि त्यानंतर पुन्हा दोन वर्षांची विश्रांती घेतली ज्याचे परिणाम माझ्या अभिनय कारकिर्दीवर झाले.’

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

चित्रपटसृष्टीत ज्यावेळी एखादी संधी चालून तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही ती संधी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असतं. पण, तुम्ही त्याच क्षणी उपस्थित नसाल, तुमचं अस्तित्वच नसेल तर मात्र तुमच्या करिअरवर याचे परिणाम होणार यात वादच नाही. माझ्यासोबतही असंच झालं असावं, बहुधा एक लोकप्रिय सेलिब्रिटी होण्यासाठीचे माझे प्रयत्न कमी पडले, अशी खंतही तिने व्यक्त केली.

आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांविषयीही तिने काही उलगडा केला. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्यासमोर काही महिला प्रधान आणि चरित्रात्मक भूमिकांचे प्रस्ताव ठेवले होते. पण, याचा अर्थ असा होता नाही, की मी सर्वसाधारण भूमिका साकारू इच्छित नव्हती. एक अभिनेत्री म्हणून मी सर्व प्रकारच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देते, असंही तिने सांगितलं.