जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन मंगळवारी विद्यापीठात पोहोचली होती. जेएनयूबाहेरील मोर्चात सहभागी होत दीपिकाने विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवला. मात्र यावेळी दीपिकाने कोणतंही भाषण किंवा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. पूर्णवेळ दीपिका शांत उभी होती आणि काहीही न बोलता निघून गेली.

दीपिकाने यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिची भेट घेत विचारपूस केली. दीपिकाने मौन बाळगण्यासंबंधी आयेषी घोषला विचारलं असता एवढ्या मोठ्या उंचीवर असताना तुम्ही बोलायला हवं होतं अशी प्रतिक्रिया दिली.

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. दीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने कोणतंही भाषण केलं नाही. सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास दीपिका पोहोचली होती. यावेळी कन्हैय्याकुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली होती. पण काहीही न बोलता निघून गेली.

आणखी वाचा – #boycottchhapaak: दीपिकाविरोधात नेटकरी आक्रमक, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी

दीपिका जेएनयूमध्ये पोहोचल्याची बातमी आणि फोटो समोर येताच सोशल मीडियावर तिच्याविरोधात ट्रेंड सुरु झाला. काही वेळातच तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली. #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. तर दुसरीकडे तिच्या भूमिकेला समर्थन मिळत असून #IsupportDeepika देखील ट्रेंड होत आहे.