जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. यावेळी तिने हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. दीपिका विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये पोहोचली होती. मात्र तिने कोणतंही भाषण केलं नाही. सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास दीपिका पोहोचली होती. यावेळी कन्हैय्याकुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली होती.

दीपिका जेएनयूमध्ये पोहोचल्याची बातमी आणि फोटो समोर येताच सोशल मीडियावर तिच्याविरोधात ट्रेंड सुरु झाला. काही वेळातच तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’वर बहिष्कार टाकण्याची मागणी होऊ लागली. #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. दीपिका आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठीच तिथे आली होती असा आरोप काहीजणांनी केला आहे. दिल्लीत नसती तर दीपिका आलीच नसती असंही काहींचं म्हणणं आहे.

एकीकडे दीपिकाविरोधात ट्रेंड सुरु असताना काहीजण मात्र तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. दीपिकाने घेतलेल्या भूमिकेवरुन तिचं कौतुकही केलं जात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा असो किंवा जेएनयू हिंसाचार बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शांत राहणं पसंत केलं असताना दीपिकाने ठोस भूमिका घेतली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे ट्विटरवर #boycottchhapaak ट्रेंड होत असताना #IsupportDeepika देखील ट्रेंड होत आहे.

दीपिकावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना तिच्या समर्थकांनी ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळी करणी सेनेने तिचं नाक कापण्याची धमकी दिली होती याची आठवण करुन दिली. तसंच चित्रपटाला फटका बसेल याची कल्पना असतानाही दीपिकाने आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं सांगत हा पब्लिसिटी स्टंट नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.