सध्याच्या घडीला कलाविश्वात अभिनेता इरफान खानच्या आजारपणाचीच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द इरफाननेच ट्विट करत आपण, एका दुर्धर आजाराशी झगडत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तेव्हापासून अनेकांनीच त्याला नेमकं झालंय तरी काय, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. कलाविश्वातही त्याविषयीच्या चर्चा रंगल्या असून, बी- टाऊनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्येही यासंदर्भातील प्रश्नांवर जास्त भर देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स २०१८’ या पुरस्कर सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणला इरफानच्या प्रकृतीविषयी प्रश्न करण्यात आला. त्यावेळी माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देताना दीपिका काही क्षण नि:शब्दच झाली. काय बोलावे हेच तिला कळेनासे झाले. मुख्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून गेले. अखेर, तिने स्वत:ला सावरत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

‘जशी त्याने सर्वांनाच विनंती केली आहे, आयुष्यात बऱ्याचदा असे काही प्रसंग येतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकांत जास्त प्रिय असतो. काही गोष्टींवर तोडगा काढण्यासाठीच हा एकांत त्यांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे अशा वेळी आपण त्यांच्या विनंतीला मान देणं अपेक्षित असतं. त्यामुळे काहीतरी चांगलं होईल अशीच आपण आशा करुया’, असं दीपिका म्हणाली. यावेळी तिने ‘पिकू’ या चित्रपटात इरफानसोबत काम करण्याचा आपला अनुभवही सर्वांसोबत शेअर केला. हा चित्रपट आपल्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्याचं तिने स्पष्ट केलं.

दीपिकाचं असं एकाएकी शांत होणं आणि परिस्थिती सावरण्यासाठी म्हणून तिने इरफानच्या प्रकृतीच्या प्रश्नावर व्यक्त होणं या गोष्टींमुळे पुन्हा एकदा बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे इरफानच्या प्रकृतीविषयी चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. तेव्हा आता खुद्द इरफानच त्याच्या प्रकृतीविषयी कोणती माहिती देतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.