स्वातंत्र्य दिन जवळ येताच या खास दिवसाचा उत्साह बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. यंदाही अगदी तसाच उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षांचा काळ लोटत आहे. अनेकांच्या प्राणांची आहूती दिल्यानंतर आणि बऱ्याच गोष्टींमध्ये तडजोड केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या देशामध्ये एक गोष्ट मात्र आजही अनेकांना सलत आहे. ती गोष्ट म्हणजे फाळणी. भारतीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घटनांपैकी एक असणाऱ्या फाळणीवर आजवर बऱ्याच चित्रपटांतून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पार्टीशन १९४७’ या आगामी चित्रपटातून हुमा झळकणार असून सध्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरु आहे.

प्रमोशनदरम्यान, अमृतसरला पोहोचलेल्या हुमाने माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी तिला बरेच प्रश्न विचारण्यात आले. फाळणीवर भाष्य करणाऱ्या कथानकाच्या चित्रपटात काम करण्याचा अनुभवही तिने यावेळी सर्वांसमोर मांडला. मुख्य म्हणजे भारत- पाकिस्तान फाळणीदरम्यान अडकलेल्या जनसमुदायाचं दु:ख तिने सर्वांसमोर आणलं. यावेळी स्वत:च्या कुटुंबियांचा अनुभवही तिने शेअर केला. ‘माझ्या आजोबांचा जन्म फाळणीपूर्व पाकिस्तानमध्ये झाला होता. तीन भाऊ, दोन बहिणी असं त्यांचं कुटुंब होतं. त्यांच्या बहिणींची लग्न झाली त्यावेळी फाळणीचेच दिवस होते. त्यामुळे दोन्ही बहिणींची कुटुंब पाकिस्तानमध्येच राहिली होती’, असं सांगत हुमाने फाळणीशी असलेलं आपलं नातं सर्वांसमोर आणलं. फाळणीच्या जवळपास एक वर्षानंतर हुमाचे वडील पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या आत्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी गेले होते. पण, त्यानंतर त्यांचं कुटुंब पुन्हा कधीच एकत्र येऊ शकलं नाही. त्यामुळे फाळणीमुळेच आपलं कुटुंब दुरावल्याची खंत हुमाच्या बोलण्यातून व्यक्त होत होती.

पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी

गेल्या काही दिवसांपासून हुमाच्या या आगामी चित्रपटाचे काही प्रोमो टेलिव्हिजनवर दाखवण्यात येत आहेत. गुरिंदर चड्ढा दिग्दर्शित या ‘पार्टीशन १९४७’ या चित्रपटामध्ये फाळणीशी निगडीत एक वेगळीच गोष्ट सर्वांसमोर येणार आहे. त्यामुळे ती गोष्ट नेमकी कोणती याबद्दलचीच उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.