देशभरात करोनाने थैमान घातलं असताना सध्या अमेरिकेतील एका वृत्ताने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत ४६ वर्षीय कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरु असून हिंसाचार सुरु आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडचेही अनेक सेलिब्रेटी या घटनेचा निषेध करत आहे. बॉलिवूडची बिनधास्त गर्ल कंगनाने यावर नाराजी व्यक्त केली असून Black Lives Matter मोहिमेला पाठिंबा देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

प्रत्येक मुद्द्यावर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडणाऱ्या कंगनाची अमेरिकेतील घटनेवर थोडी वेगळी प्रतिक्रिया आहे. पिंकविलाशी बोलताना कंगनाने पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. कंगनाने म्हटलं आहे की, “जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येचा भारताशी संबंध जोडायचं असेल तर मग महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली होती. त्यावेळी बॉलिवूडच्या एकाही सेलिब्रेटीने मत व्यक्त केलं नव्हतं. हे तिथेच झालं आहे जिथे सेलिब्रेटींची संख्या जास्त आहे”.

पुढे बोलताना कंगनाने सांगितलं आहे की, “बॉलिवूडचे सेलिब्रेटी काही वेळासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हॉलिवूडची नक्कल करतात हे लज्जास्पद आहे. भारतातल्या लोकांमध्ये गुलामगिरीची सवय अजूनही आहे आणि तेच इंग्रज मोहीम चालवतात. त्यानंतर अनेकजण असेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकतात”.

“पर्यावरणासारख्या मुद्द्यावर भारतातील अनेक लोक काम करत असून काहींना पद्मश्रीदेखील मिळालं आहे. पण बॉलिवूडचे लोक त्यांचं समर्थन करण्याऐवजी एका परदेशी मुलीचं समर्थन करतात. कारण त्यांना वाटतं समर्थन देण्यासाठी साधू किंवा आदिवासी इतके आकर्षक नाहीत,” असंही कंगनाने म्हटलं आहे. भारतीय मुद्द्यांवर शांतता बाळगणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रेटींना कंगनाने चांगलंच सुनावलं आहे.