भारतातील किंबहुना जगातील सर्वात जुनं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणासी शहराला आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने भेट दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने गुरुवारी वाराणसीला भेट देत गंगा आरतीचा अविस्मरणीय अनुभव घेतला. सोनेरी रंगाची साडी आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये दशाश्वमेध घाटावर ‘क्वीन’ कंनाने गंगेची आरती केली. गंगा नदीचं पावित्र्य लक्षात घेत यावेळी तिने ‘हर हर महादेव’ म्हणत गंगेच्या पाण्यात डुंबण्याचाही अनुभव घेतला.

गंगाआरती पाहण्यासाठी वाराणसीमधील जवळपास सर्वच घाटांवर बरीच गर्दी होते. त्यातही कंगना आरती करायला येणार म्हटल्यावर त्या ठिकाणी चाहत्यांचा पूरच आला होता. यावेळी हजारो चाहत्यांनी गंगा आरती करतेवेळी कंगनाचे फोटो काढले त्यासोबतच तिचे काही व्हिडिओसुद्धा शूट केले. सोशल मीडियावरही तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत. यावेळी कंगनाने तिच्या आगामी ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचं २० फूट उंचीच्या पोस्टरचही अनावरण केलं.

विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’ चित्रपटात सैफ अली खान आणि शाहिद कपूरसोबत झळकल्यानंतर कंगना झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ ( Manikarnika – The Queen of Jhansi ) या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण जगर्लामुदी म्हणजेच ‘क्रिश’ करत असून, चित्रपटाची कथा के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ चा स्क्रिनप्लेदेखील के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनीच लिहिली आहे.