05 March 2021

News Flash

PHOTO : … असा झाला नव्या घरात कंगनाचा गृहप्रवेश

हे घर उभं करण्यासाठी कंगनाला जवळपास ३० कोटींपेक्षा जास्त खर्च आल्याचं कळतं.

छाया सौजन्य- ट्विटर

एखाद्या सेलिब्रिटीच्या वाट्याला प्रसिद्धी आल्यावर त्याच्या किंवा तिच्या खासगी आयुष्याविषयी, राहणीमानाविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल पाहायला मिळतं. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. कंगना चित्रपटांमुळे जितकी चर्चेत असते तितकीच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. मुळात आपल्या खासगी आयुष्याविषयी ती स्वत:हून बऱ्याच गोष्टी उघड करत नसली तरीही फॅन पेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याविषयी बरीच माहिती सर्वांसमोर येते. सध्या बॉलिवूडची ही ‘क्वीन’ प्रकाशझोतात आली असून भलतीच आनंदात दिसतेय, कारण नव्या घरात तिचा गृहप्रवेश झाला आहे.

सोशल मीडियावर ‘क्वीन’च्या या नव्या घराच्या गृहप्रवेशाआधी केल्या गेलेल्या पूजेचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कंगना तिच्या आई- वडिलांसोबत पूजाअर्चा करताना दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनालीतील सिमसा येथे कंगनाचे हे घर आहे. तिच्या या नव्या घराला ‘कार्तिकेय निवास’ असे नाव देण्यात आले आहे. कंगना कार्तिकेयची (शंकराचा मुलगा) भक्त असल्यामुळेच तिने देवाची कृपादृष्टी म्हणून आपल्या नव्या वास्तूला हे नाव दिल्याचे म्हटले जात आहे. व्यग्र वेळापत्रकामधून आपल्या कुटुंबाला तितकंच प्राधान्य देणारी ही अभिनेत्री धार्मिक परंपरा आणि पूजाअर्चा या सर्व गोष्टींनाही फार महत्त्व देत असल्याचं हे गृहप्रवेशाचे फोटो पाहून लक्षात येत आहे.

‘क्वीन’ या चित्रपटाच्या (२०१४) यशानंतर मनालीत कंगनाने जवळपास १० कोटींना ही जागा खरेदी केली होती. त्यानंतर या जागेवर तिने स्वतःचे घर बांधण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडच्या ‘क्वीन’चे हे स्वप्नवत घर साकारण्यासाठी तब्बल चार वर्षं लागली.

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

सुत्रांच्या माहितीनुसार, या घरात एकूण आठ बेडरुम असून, प्रत्येक रुममधून पर्वतरांगांचं नयनरम्य दृश्य दिसतं. त्यासोबतच प्रत्येक बेडरुमबाहेर बाल्कनीसुद्धा आहे. घराच्या छतावर काच असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये घरात पुरेपूर सूर्यप्रकाश येण्याची सोय करण्यात आली आहे. घराचं काम सुरु असताना कंगना स्वतः मनालीत वरचेवर जाऊन कामाची स्थिती पाहत होती. तिच्या या सुंदर घराला बांधण्यासाठी कंगनाला जवळपास ३० कोटींपेक्षा जास्त खर्च आल्याचं कळतं. मुंबईतील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींची घरं डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शबनम गुप्ता हिने कंगनाचं घर सजवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 8:34 am

Web Title: bollywood actress kangana ranaut performs griha pravesh puja along with her family at her posh manali mansion
Next Stories
1 फेमिनाच्या मुखपृष्ठावर ऐश्वर्या राय बच्चनचा ग्लॅमरस फोटो
2 VIDEO: …जेव्हा कपूर बहिणी हिलरी क्लिंटनची प्रतीक्षा करतात
3 VIDEO: …जेव्हा सेटवर अचानक ‘धकधक गर्ल’ अवतरते
Just Now!
X