कोणाचाही वरदहस्त नसताना आपल्या अभिनयाच्या बळावर अभिनेत्री कंगना रणौतने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. सध्याच्या घडीला ती आगामी चित्रपटांतच्या चित्रीकरणात असून, तिच्या भूमिकाही तितक्याच आश्वासक असल्याचं कळत आहे. पण, बी- टाऊनची ही क्वीन अभिनेत्री येत्या काळाच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चांनी जोर धरला आहे.
देशाच्या राजकारणाकडे पाहण्याची कंगनाची एकंदर दृष्टी आणि तिचे विचार पाहता तिच्या राजकीय प्रवेशाबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. त्याविषयीच कंगनाने आता काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करत सूचक वक्तव्य केल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला तरी राजकारणात प्रवेश करण्याच्या विचारात नसल्याचं ती म्हणाली. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत “मी सध्या ‘मणिकर्णिका’, ‘मेंटल है क्या’ या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. त्याशिवाय ‘पंगा’ या चित्रपटाचीही आम्ही नुकतीच घोषणा केली आहे. असं असलं तरीही जेव्हा केव्हा मी राजकारणाची वाट निवडेन तेव्हा मी त्यात स्वत:ला झोकून देईन. त्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करेन”, असं ती म्हणाली.
वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट
देशसेवेचा विडा उचलल्यानंतर मग लग्न, कुटुंब आणि दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणं याला तितकं प्राधान्य देण्यात येणार नाही. कारण राजकीय नेता हा शासनाचा, देशाचा सेवक असतो याच विचारांवर कंगना ठाम आहे. मुख्य म्हणजे राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपण अविवाहित राहू, याकडेही तिने सर्वांचं नकळत लक्ष वेधलं. त्यामुळे आता तिचे हे एकंदर विचार पाहता आता येत्या काळात ती चित्रपटांच्या दुनियेतून राजकारणासाठी पूर्ण वेळ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 1:06 pm