बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची बहिण रंगोली चंडेल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचे पहायला मिळते. बऱ्याच वेळा ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. पण अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. नुकताच रंगोलीने ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रंगोलीने ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे’ असे ट्विट केले होते. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि तिला पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये १०,००० खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी हॉस्पिटलमध्ये देखील १०,००० खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत. रंगोलीने योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाला पाठिंबा देत ट्विट केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

याआधी रंगोलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करुन गॅलरीत उभे राहून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची फ्लॅश लाइट लावण्याच्या आवाहनावरुन अभिनेत्री तापसी पन्नूने केलेल्या ट्विटला चांगलेच उत्तर दिले होते. तिने ट्विटमध्ये तापसीला बी-ग्रेड अभिनेत्री म्हणत सुनावले होते. तसेच मोदींवर निशाणा साधलेल्या अनुराग कश्यपला देखील तिने चांगलेच सुनावले होते.