24 November 2017

News Flash

आदित्य पांचोलीने कंगनाला भररस्त्यात मारलं होतं?

तितक्यातच कंगनाने त्या ठिकाणहून पळ काढला.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 2:00 PM

कंगना रणौत, आदित्य पांचोली

घरेलू हिंसा, अत्याचार या सर्व गोष्टींचा सामना अमुक एका वर्गातील महिलांनाच करावा लागतो असं नाही. तर कलाविश्वातही अशा घटना घडतात. झगमगाट, प्रसिद्धी आणि लोकप्रियता या गोष्टींच्या पलीकडे बॉलिवूडचा खरा चेहरा पाहायला मिळतो. अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन हे दाहक सत्य एका अर्थी सर्वांसमोर आलं, असं म्हणायला हरकत नाही. नेहमीच आपली मतं स्पष्टपणे सर्वांसमोर मांडणारी कंगना ‘आप की अदालत’मध्ये दिलेल्या मुलाखतीनंतर चांगलीच पेचात सापडली. कारण तिच्या निर्भीडपणाचं कौतुक करणाऱ्यांसोबतच काहीजणांनी तिच्यावर आरोपही करण्यास सुरुवात केली आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आदित्य पांचोलीसोबतचं तिचं नातं सर्वांसमोर ठेवलं.

आदित्यवर तिने लावलेले आरोप खोटे असून, तिला वेड लागल्याचंही म्हटलं गेलं. आता तर या सर्व प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. चित्रपटसृष्टीतून सध्याच्या घडीला जवळपास सर्वजण ‘क्वीन’ कंगनाच्या विरोधात उभे ठाकले असतानाच एका प्रत्यक्षदर्शीने तिची बाजू घेत सर्वांसमोर ‘त्या’ रात्रीचं वास्तव उघड केलं. त्याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही सोशल मीडियावर सध्या यासंबंधीचा व्हिडिओ चर्चेत असून काही वेबसाइट्सनेही हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

त्या रात्री कंगना आणि आदित्यमध्ये नेमकं काय घडलं होतं याचं कथन एका प्रत्यक्षदर्शीने केल्यामुळे सध्या सोशल मीडियावरही त्यासंबंधीच्या चर्चांना बरच उधाण आलंय, “जुहूच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलबाहेर एक मुलगी रिक्षामधून मदतीसाठी आवाज देत होती. चालकाला ती वारंवार रिक्षा वेगाने चालवण्यास सांगत होती. तिने माझ्याकडेही मदत मागितली. पण, तितक्यात धिप्पाड माणूस तिथे आला आणि त्याने केसांना धरून तिला रिक्षाबाहेर खेचलं. ती मुलगी होती अभिनेत्री कंगना रणौत आणि तो माणूस होता अभिनेता आदित्य पांचोली. हा सर्व प्रकार पाहून मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने ‘सरदारजी तुम बीचमे मत पडो. ये हमारे घरका मॅटर है…’ असं म्हटलं. त्यावेळी मी त्यांना ही भांडणं घरातली आहेत तर घरातच मिटवा असं म्हटलं. त्यावेळी आदित्यचा राग अनावर झाला होता. पण, रस्त्यावरील इतरांच्या साह्याने मी त्याला पकडलं आणि तेवढ्यातच कंगनाने त्या ठिकाणहून पळ काढला. त्यानंतर मी लगेचच पोलिसांना आणि काही पत्रकारांनाही फोन केला”, असं त्या प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

प्रत्यक्षदर्शीने केलेला हा खळबळजनक खुलासा पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता नेमकं खरं कोण बोलतय हा प्रश्नसुद्धा वारंवार उपस्थित केला जातोय.

First Published on September 13, 2017 1:58 pm

Web Title: bollywood actress kangana ranaut was beaten by actor aditya pancholi says eyewitness