करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला असून अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून सरकारवर टीका करत आहे. नुकतंच तिने सरकारी यंत्रणेवर टीका करणारं टीक करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा कसला देश आहे जो डॉक्टरांची सुरक्षा करु शकत नाही असा सवाल रंगोलीने विचारला आहे. तसंच बंदूक चालवू शकत नाही तर पोलिसांना दिली कशाला? असंही तिने विचारलं आहे.

रंगोलीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “हा कसला देश आहे जो आपल्या डॉक्टरांना सुरक्षा देऊ शकत नाही ? हे कसली यंत्रणा आहे जी निर्दोषांच्या रक्ताने आपले हात रंगवत आहे ? काय आहे ही कायदा आणि सुव्यवस्था…चालवू शकत नाही तर पोलिसांच्या हातात बंदूक कशाला दिली आहे ? अशा यंत्रणेची लाज वाटते”

रंगोली परखडपणे ट्विटरला आपलं मत मांडत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही तिने टीका केली होती. ‘मुंबईचं इटली होणार. पुढे आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे’, असं रंगोलीने ट्विट केलं होतं. रंगोलीने याआधीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाची स्तुती केली होती. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे’, असा टोमणा तिने मारला होता.

नरेंद्र मोदींनी लॉकडाउन वाढवल्याच्या निर्णयाचं कौतुक करतानातिने म्हटलं होतं की, “मोदीजी तुम्ही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय अगदी योग्य आहे. तुम्ही खुपच चांगल्या प्रकारे आमचं मार्गदर्शन केलं. परंतु यावेळचं तुमचं भाषण खुपच लहान होतं. तुम्ही आणखी थोडा वेळ बोलायला हवं होते. आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळालं असतं,” अशा आशयाचं ट्विट रंगोलीने केलं आहे.