एकेकाळी बॉलिवूडमधील काही गाजलेल्या आणि नेहमीच चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणजे शाहिद कपूर आणि करिना कपूर. शाहिद-करिनाच्या नात्यात बऱ्याच वर्षांपूर्वी दुरावा आला आणि दोघांनीही त्यांच्या वाटा वेगळ्या केल्या. इतकंच काय तर एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान करिना आणि शाहिद यांच्यात पुन्हा एकदा मैत्रीच्या नात्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले होते. झालं गेलं सारं विसरत करिना-शाहिदने एकमेकांची विचारपूस केली. पण, नुकतेच करिनाने प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे तिने अप्रत्यक्षपणे शाहिदच्या पत्नीवर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी जागतिक महिली दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मीराची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीदरम्यान आपल्या मातृत्त्वाविषयी मत मांडताना मीराने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचा रोष तिने ओढावला होता. मातृत्त्वाविषयी असाच एक प्रश्न करिनाला विचारला असता ती म्हणाली, ‘मी कोणत्या प्रकारे माझ्या मुलाचे संगोपन करते हे येणारा काळच ठरवेल. मी काही त्याबद्दलचा गाजावाजा करणार नाही किंवा तैमुरवर किती प्रेम करते हे काही ओरडून सांगणार नाही. माझ्या वर्तणुकीकडे इतरांचे लक्ष असल्याचे दडपण माझ्यावर नेहमीच असते. पण, ती परिस्थिती तुम्ही कशी सावरता हे जास्त महत्त्वाचे आहे.’ यावेळी करिनाने गरोदरपणाविषयीसुद्धा तिचे मत मांडले. ‘प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपणातील नऊ महिन्यांचा तो काळ आणि अनुभव वेगळा असतो. त्यामध्ये साम्य नसतेच. त्यामुळे त्या क्षणी मला काय वाटत होते हे कोणालाच ठाऊक नव्हते. कारण त्यांच्यापैकी कोणच मला व्यक्तिगतरित्या ओळखत नव्हते.’ असे करिना म्हणाली.
करिनाच्या या थेट वक्टव्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेकांनीच तिची पाठराखण केली आहे. करिनाने नेहमीच महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावरुन तिची ठाम भूमिका मांडण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोणी कसाही विचार करो… आपण मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असाच काहीसा पवित्रा बेबो करिनाने अवलंबल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान, ‘फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठे होताना पाहायचे आहे’, या वक्तव्यामुळे मीरा राजपूतवर अनेकांचा रोष ओढावला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 6:15 pm