भारतीय चित्रपटसृष्टीतील आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मधुबाला हिच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट निर्माण होत असल्याचे आपणास माहीत आहेच, मधुबालाची बहिण ब्रीज भूषण हिनेच तसं म्हटलयं त्यामुळेच ‘सौंदर्याची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिभासंपन्न अभिनेत्रीच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या चरित्रपटाची उत्सुकता निर्माण झालीय.

पण या चित्रपटात ‘मधुबाला ‘ची भूमिका कोणी बरं साकारावी याची चर्चा होणे स्वाभाविक आहेच. या चित्रपटाचा दिग्दर्शक खूप विचारपूर्वक त्याचा निर्णय घेईलच. या चित्रपटाची निर्मिती होत असल्याचे जाहीर होताच अनेकांना वाटते माधुरी दीक्षितच ‘मधुबाला’ म्हणून जास्त योग्य ठरेल. यानिमित्ताने एक जुनी आठवण सांगितली पाहिजे, नव्वदच्या दशकात ख्यातनाम फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी एकदा ‘मुगल ए आझम ‘मधील प्यार किया तो डरना क्या गाण्यातील मधुबालाचे अनारकली रुप माधुरीला देत झकास आकर्षक फोटो सेशन केले. त्यात खरंच माधुरी दीक्षितमध्ये मधुबालाचा छान दिलखुलास भास होत होता. या दोघींच्या चेहर्‍यावर हास्य कायमस्वरूपी असते हा गुण खूप महत्त्वाचा आहे. दोघींच्या चेहर्‍याची ठेवणही जवळपास सारखीच आहे. विशेषतः ‘पाहणे’ हा गुण. चेहर्‍यावर योग्य भावमुद्रा व बोलका कटाक्ष खूप काही सांगून जातात. विशेष म्हणजे लोकसत्ताच्या ‘रंग तरंग’ पुरवणीत माधुरी दीक्षितचे असे मधुबालाचा प्रत्यय देणारे भले मोठे छायाचित्र प्रसिद्ध करुन याच विषयावर तिची मनमोकळी मुलाखतही होती. तसे पाहिले तर या बेभरवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील चढउतारात असे हास्य सांभाळून वाटचाल करणे सोपे नाही. मधुबालाला फार कमी आयुष्य लाभले.

अवघे ३३ वर्षे. १४ फेब्रुवारी १९३३ चा जन्म आणि २३ फेब्रुवारी १९६९ ला कर्करोगाने निधन. तिचे १९६० साली किशोर कुमारशी लग्न झाले. किशोर कुमारने तिच्या आजारपणात तिची भरपूर सेवा केली. मधुबालाच्या प्रेमात एकाच वेळी दिलीप कुमार आणि प्रेमनाथ पडले. असा प्रेम त्रिकोण खूप रंगला. यावरून केवढ्या तरी कथा -दंतकथा -गोष्टी प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यात तथ्य किती हे कधीच स्पष्ट झाले नाही. विशेषतः के. असिफ निर्मित आणि दिग्दर्शित ‘मुगल ए आझम ‘(१९६०) या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेमकहाणी अतिशय जोरात चालू होती. पण मधुबालावर तिच्या पालकांची करडी नजर होती. अशातच त्यांच्या प्रेमाला विरोध वाढला. हे दोघे वेगळे झाले. पण हा चित्रपट त्यांनी पूर्ण होऊ दिला. व्यक्तीगत वाद बाजूला सारून प्रणय दृश्ये खूप छान रंगवली. पण हे दोघे वेगळे होण्याचा गोष्टीत आणखी काही गोष्टी घडल्या. निर्माता आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’मधून त्यांनी मधुबालाला काढले हे जाहीर करण्यासाठी वेगळी जाहिरात दिला, त्यांनी चित्रपटातील सर्वच कलाकारांची नावे देऊन मधुबालाच्या नावावर काट मारली. हा अपमान सहन न झाल्याने मधुबालाच्या आईने अशीच एक जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात मधुबालाच्या सर्व चित्रपटांची नावे देऊन फक्त ‘नया दौर’वर ठळक फुल्ली मारली.

मधुबालाने सत्तर चित्रपटात भूमिका साकारली. केदार शर्मा दिग्दर्शित ‘नीलकमल ‘( १९४७) हा तिचा पहिला चित्रपट होय. त्यात राज कपूर नायक होता. १९५८ हे तिच्या अष्टपैलू कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाचे वर्ष . फागुन, हावरा ब्रिज, काला पानी व चलती का नाम गाडी असे तिचे चित्रपट सुपरहिट ठरले. कधी किशोर कुमारसोबत ‘पाच रुपया बारा आना’चा खट्याळपणा (चलती का नाम गाडी) तर कधी देव आनंदसोबत ‘अच्छा जी मै हाती’चा लाडिकपणा (काला पानी). मधुबालाचा गोडवा या गाण्यात दिसतो. काहीना मात्र तिचे ‘मुगल ए आझम ‘चे अनारकली रुप व प्यार किया तो डरना क्या नृत्य भारी वाटतं.

पाहा : Mulk Trailer – हा देश मुस्लीमांचा आहे की नाही?, हाताळला महत्त्वाचा प्रश्न

मधुबालाचे व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य याबाबत आजही म्हणजे तिच्या निधनानंतर जवळपास पन्नास वर्षानंतरही कुतूहल आहे. ते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपयोगी पडेल. पण ‘मधुबाला ‘कोण असावी? प्रियांका चोप्रा अथवा दीपिका पदुकोण यांच्या नावावर विचार करायला काय हरकत आहे? आज दोघीही टॉपवर आहेत. खूप सुंदर व मेहनती आहेत. महत्त्वाचे म्हणजे मधुबालाच्या प्रत्यक्ष आयुष्यातील वयाशी त्यांचे वय आणि पर्सनॅलिटी अधिक प्रमाणात जुळत असल्याने त्यांचा विचार व्हावा असे वाटते. अर्थात या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक कोणत्या निकषावर नाव निश्चित करतोय हे जसे महत्त्वपूर्ण आहे तसेच मधुबाला साकारणे सोपेदेखिल नाही. त्यात फक्त मधुबालासारखे दिसणेच फक्त नाही तर मधुबालासारखे असणेही खूप आव्हानात्मक आहे. हा चित्रपट निर्माण व्हायला हवा हे जसे महत्त्वाचे तेवढेच ते अवघड देखील आहे. होय ना?