हिंदी चित्रपटसृष्टीत ‘सौंदर्याची खाण’ ही उपमा जर कोणत्या अभिनेत्रीला द्यायची झाली तर अनेकजण एकाच अभिनेत्रीच्या नावाला पसंती देतात. ती अभिनेत्री म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीची अनारकली मधुबाला. ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मधुबाला यांची बहिण मधुर ब्रीज भूषण यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मल्लिका- ए- हुस्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सौंदर्यवतीचा प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

‘माझ्या बहिणीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आम्ही लवकरच साकारणार असून, त्याच्या निर्मितीची धुरा माझ्या मित्रपरिवाराने घेतली आहे. त्यामुळे मधुबाला यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात बॉलिवूडशी संलग्न कोणतीही व्यक्ती असेल तर त्यांनी कृपया तसा विचार करु नये, मुळात त्यांनी सर्वप्रथम माझी रितसर परवानगी घ्यावी’ असं मधुर म्हणाल्या.

आतापर्यंत मधुर यांच्याकडे मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी बऱ्याच निर्मात्यांनी विचारणा केली आहे. पण, त्या सर्व निर्मात्यांचे प्रस्ताव मधुर यांनी नाकारले आहेत. ‘बॉलिवूडमधील काही मंडळी गेल्या बऱ्याच दिवसांपासून मधुबाला यांच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा करत होते. पण, त्या सर्वांचे प्रस्ताव त्यांनी नाकारले होते. आपल्या बहिणीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठीच आताची वेळ योग्य असल्याची त्यांची धारणा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

मादाम तुसाँ या संग्रहालयात मधुबाला यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यापासून मधुर त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकच्या निर्मितीच्या विचारात होत्या. दरम्यान, या बायोपिकविषयी फार काही माहिती समोर आली नसून आता येत्या काळात मधुबाला यांच्या आयुष्यावरील कोणत्या प्रसंगांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.