अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आणि तिच्या दैनंदिन आयुष्यातील दिनक्रमामुळे चर्चेत असते. ती बऱ्याच कार्यक्रमांना, फॅशन शोला वगैरेही हजेरी लावते. अशाच एका कार्यक्रमाला ती हजेरी लावणार होती. पण, आता मात्र त्या कार्यक्रमाशी आणि मलायकाशी संबंधित वेगळ्याच चर्चा समोर आल्या आहेत.

‘मिड- डे’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार १५ जुलै रोजी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे आयोजित करण्यात आलेल्या एका फॅशन इवेंटमध्ये मलायका उपस्थित राहणार होती. पण, अगदी शेवटच्या क्षणी आयोजकांशी झालेल्या मतभेदानंतर तिने कार्यक्रमात येण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठीचे व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, गोल्ड आणि सिल्वहर टेबल त्यासोबतच इतर सर्व तिकिटांची विक्री करण्यात आली होती. मंगळवारी तिने (मलायकाने) डान्स परफॉरमनस देण्याची तयारी दाखवली होती. पण, दुसऱ्याच दिवशी तिने कार्यक्रमात येण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी रवाना होण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच तिने हा निर्णय घेतला होता. मुळात आयोजकांनी बुधवारच्या आधीच मलायकाला कार्यक्रमासाठीचे पूर्ण पैसे देण्याचं कबुल केलं होतं. पण, दिलेल्या शब्दाला न जागल्यामुळेच तिने ऐनवेळी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

दरम्यान, मलायकाच्या या निर्णयानंतर कार्यक्रमच रद्द झाल्याचं कळत आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रम रद्द होण्याचं मूळ कारण स्पष्ट न करता काही अडचणींमुळेच कार्यक्रम तुर्तास रद्द केल्याचं स्पष्ट केलं. तर इथे मलायकाला याविषयी प्रश्न विचारला असता, आयोजकांशी मतभेद झाल्यामुळेच या प्रकरणाने डोकं वर काढलं पण, आता हा वाद मिटल्याचं तिने स्पष्ट केलं.