अभिनेत्री, मॉडेल लिसा हेडन सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. लिसा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध प्रोजेक्ट्सपासून ते अगदी नव्या लूकपर्यंत आणि आपल्या मुलासोबतच्या काही खास क्षणांपर्यंत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अस असल तरी, काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं तिल चांगलच महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे. लिसाने नुकतेचे तिच्या नव्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यामध्ये तिचे केस पूर्णपणे राखाडी रंगाने रंगवल्याचे दिसत आहे.

खरंतर लिसा नेहमीच तिच्या लूकमध्ये नवनवे प्रयोग करताना दिसते. पण, तिचा हा राखाडी केसांमधील लूक नेटकऱ्यांच्या पसंतील पडला नाही. तिच्या प्रत्येक फोटोवर काहीजणांनी ‘तू भूत वाटते आहेस’, अशा प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी तिची तुलना किम कार्दाशिअनसोबत केली.

वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

एखाद्या भयपटातील अभिनेत्रीप्रमाणे हा नवा लूक सर्वांनाच घाबरवतोय, असे म्हणत काही नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला. तर काहींनी मात्र तिची प्रशंसा करण्याचेच सत्र सुरु ठेवले. ‘लिसा तू या लूकमध्ये खू्प छान दिसते आहेस, केसांचा हा रंग तुझ्यावर अगदी खुलून दिसतो आहे’, असे म्हणत तिचा लूक आवडल्याचे स्पष्ट केले. आपल्या फोटोंवरील प्रतिक्रियांवर लिसा व्यक्त होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पण, नेटकऱ्यांच्या या संमिश्र प्रतिक्रियांना गांभीर्याने घेणाऱ्यांपैकी लिसा नाही. त्यामुळे तिच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही, असेच अनेकांचे म्हणणे आहे.