देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही आंदोलनावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत नाव आहे ते म्हणजे अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज याचं. कंगनासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर दिलजीत चर्चेत असून ट्विटरच्या माध्यमातून तो वारंवार व्यक्त होत आहे. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही दिलजीतच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली असून आपलं मत व्यक्त केलं आहे.

प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”. प्रियांका चोप्राचं हे ट्विट दिलजीतने रिट्विट केलं आहे.

आणखी वाचा- ‘शेतकरी आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका’; दिलजीतचं जनतेला आवाहन

शेतकरी आंदोलनातील एक आजी सोशल मीडियावर चर्चेत आली होता. कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली. कंगनाने त्या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, त्यानंतर ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलनावर भाजपा खासदार सनी देओल यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला विरोधकांचा पाठिंबा
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. विरोधकही मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.

केंद्र सरकार नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य करीत नसल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि दहा प्रमुख कामगार संघटनांनीही शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला होता. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, ‘आप’, शिवसेना आदी पक्षांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर करणारे संयुक्त निवेदन विरोधकांनी काढले आहे.