हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही बरीच चर्चेत आली आहे. ‘क्वांटिको’ या मालिकेमुळे प्रियांकाने परदेशी प्रेक्षकांचीही मनं जिंकली. कलाविश्वातील या उल्लेखनीय कामगिरीसोबतच ही ‘देसी गर्ल’ समाजसेवेतही सक्रिय आहे. विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रियांकाला तिच्या याच समाजसेवेसाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार मिळाला आहे.

‘हार्मनी फाऊंडेशन’तर्फे हा पुरस्कार प्रियांकाला जाहीर करण्यात आला असून, प्रियांकाच्या वतीने तिच्या आईने म्हणजे डॉ. मधु चोप्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रियांकाच्या वतीने सर्वांचे आभार मानत त्या म्हणाल्या, ‘प्रियांकाच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारते आहे. एक आई म्हणून मला तिचा फारच अभिमान वाटतोय. इतरांप्रती आपल्या मनात कायमच प्रेम असणारी आणि नेहमीच प्रामाणिकपणे वागणाऱ्या माझ्या मुलीचा मला प्रचंड अभिमान वाटतोय. जितकं तुम्ही या समाजाला द्याल त्याचीच परतफेड म्हणून तुमच्याही वाट्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी येतील, याचे उत्तम उदाहरण प्रियांकाने प्रस्थापित केले आहे.’ प्रियांकाच्या आयुष्यावर मदर तेरेसा यांचा नेहमीच प्रभाव पाहायला मिळाला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतही मदर तेरेसा यांच्याविषयीचे विचार सर्वांसमोर मांडत अनेकांची मनं जिंकली होती. त्यामुळे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने तिच्यासाठी खास आहे असे म्हणायला हरकत नाही. काय म्हणाली प्रियांका त्यावेळी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

कलाविश्वात चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रियांका युनिसेफच्याही विविध उपक्रमाममध्ये सहभागी होते. काही महिन्यांपूर्वीच युनिसेफची सदिच्छादूत म्हणून तिने जॉर्डन येथे निर्वासितांच्या कॅम्पला भेट दिली होती. त्यावेळी आपल्या लहान चाहत्यांसोबत प्रियांकाने धमाल करत त्याविषयीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.