अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे. अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत असणाऱ्या नात्यामुळे प्रियांकाविषयीच्या बऱ्याच चर्चांनी सोशल मीडियावरही जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच ही ‘देसी गर्ल’ तिच्या बहुचर्चित प्रियकरासोबत भारतात आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबियांचीही निकने भेट घेतली.

मायदेशी सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर प्रियांकाने आता निकसोबतच्या नात्यावर अतिशय सूचक वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही आता एकमेकांना ओळखण्यासाठी जास्त वेळ देऊ लागलो आहोत. माझ्यामते हा एक सुरेख अनुभव आहे. किंबहुना निकसाठीसुद्धा हा एक सुरेख अनुभव आहे असं मला वाटतं. ही खुपच सुरेख काळ आहे’, असं प्रियांका म्हणाली. प्रियांकाचं हे वक्तव्य पाहता आता येत्या काळात तिच्या आणि निकच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

दरम्यान, निकसोबत भारतात आलेल्या प्रियांकासाठी तिचा हा प्रवास काहीसा खास होता, अशी प्रतिक्रिया अनेकांनीच दिली होती. त्याविषयी प्रियांका म्हणाली, ‘माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य हाच एक प्रवास आहे. दर दुसऱ्या आठवड्याला मी विमानप्रवास करते. माझ्या कुटुबियांचाही प्रवास सुरु असतो. माझा मित्रपरिवारही माझ्यासोबत प्रवास करतो. त्यामुळे या सर्व गोष्टी माझ्यासाठी आता सवयीच्याच झाल्या आहेत, त्यात अप्रूप वाटण्यासारखं काहीच नाही.’