प्रियांका चोप्रा ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नासाठी हजर राहणार असून, सध्या त्याविषयीच्या बऱ्याच चर्चांना कलाविश्वात उधाण आलं आहे. मुख्य म्हणजे प्रियांका मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या शाही विवाहसोहळ्यात मेगनची ‘ब्राइड्समेड’ असणार आहे अशा चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या शाही विवाहसोहळ्यात तुझी हजेरी असणार का, असा प्रश्न ज्यावेळी प्रियांकाला एका प्रसिद्ध मासिकाच्या मुलाखतीत विचारण्यात आला, तेव्हा ‘जर त्या ठिकाणी मी तुम्हाला दिसले तर त्याबद्दल तुम्हाला कळेलच’, असे उत्तर दिले. प्रियांका मेगनच्या ब्रायडल पार्टीलाही हजेरी लावू शकते असे म्हटले जातेय. पण, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्रियांका आणि मेगन या खूप चांगल्या मैत्रिणी असून, त्यांच्या मैत्रीचे किस्से सोशल मीडियावरही पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या मैत्रीणीच्या आयुष्यातील खास दिवशी ‘देसी गर्ल’ हक्काने हजेरी लावणार असल्याचे कळते. पण, ती मेगनची ब्राइड्समेट असेलच याबद्दल मात्र साशंकता आहे. कारण, शाही विवाहसोहळ्यांमध्ये नववधूला साथ देण्यासाठी सहसा प्रौढ ब्राइड्समेड नसतात, अशी माहिती रॉयल्टी एक्स्पर्ट मार्कलेन कोएनिग यांनी ‘टाऊन अँड कंट्री’ला दिली. वयाची तिशी ओलांडलेल्या महिलेला ब्राइड्समेड म्हणून सहसा निवडलं जात नाही, असं त्या म्हणाल्या. तेव्हा आता ‘देसी गर्ल’ नेमकी मेगनच्या लग्नात तिची साथ देणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान ब्राइड्समेड होण्याची संधी मिळणार की नाही, ही पुढची गोष्ट. पण, सध्यातरी प्रियांका तिच्या खास मैत्रीणीच्या म्हणजेच मेगन आणि प्रिन्स हॅरीच्या लग्नासाठी उत्सुक आहे हेच खरे.

https://www.instagram.com/p/BcA3fplASko/