अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्या विवाहसोहळ्याच्या चर्चा काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीयेत. मेगन आणि हॅरीच्या आयुष्यातील या अत्यंत खास दिवसासाठी फक्त ब्रिटनमध्येच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. दिग्गज आणि मान्यवरांची उपस्थिती, कलाविश्व आणि राजेशाही थाटाची अनोखी सांगड या सर्व गोष्टी या शाही विवाहसोहळ्यामध्ये आकर्षणाचा बिंदू ठरल्या. अशा या लग्नसोहळ्यावर भारतीयांचीही नजर होती. त्यामागचं कारण ठरली ती म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा.

प्रियांका आणि मेगन या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी असून, आपल्या मैत्रीणाला शुभेच्छा देण्यासाठी ही ‘देसी गर्ल’ शाही विवाहसोहळ्याला पोहोचली होती. जवळपास ६०० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्यानंतर प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही मेगनला तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वाचा : प्रिन्स हॅरी- मेगन मार्कलच्या शाही विवाहसोहळ्याचा खर्च नेमका आहे तरी किती?

प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या विवाहसोहळ्यातील एक सुरेख फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा वेळही थांबतो आणि आज तो दिवस आला आहे.’ एक मैत्रीण म्हणून मेगनविषयी आपल्या मनात जितक्या भावना दडलेल्या आहेत, त्या सर्व भावनांना तिने या पोस्टच्या माध्यनातून वाट मोकळी करुन दिली. त्यासोबतच या स्वप्नवक विवाहसोहळ्याचं आपल्याला साक्षीदार होता आल्याचा आनंदही तिने या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला. मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरीच्या विवाहसोहळ्यात सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेल्या गोष्टींमध्ये प्रियांका चोप्राचंही नाव येतं. एका वेगळ्याच आणि साजेशा अंदाजात तिची या सोहळ्यातील उपस्थिती अनेकांनाच भावली.