लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात बरीच खळबळ माजली आहे. हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप बऱ्याच अभिनेत्रींनी लावला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. बऱ्याच हॉलिवूड अभिनेत्रींसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींनीसुद्धा त्यानंतर या प्रकरणात उडी घेत याविषयी त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केली. याविषयीच आता अभिनेत्री राधिका आपटेनेही तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

राधिका नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिची ठाम मतं मांडते. यावेळीसुद्धा तिने आपले मत मोठ्या धाडसाने सर्वांसमोर मांडले. ‘आजही बऱ्याच घरांमध्ये लैंगिक शोषण होते. त्यामुळे हा प्रकार फक्त सिनेसृष्टीत घडतो असे नाही. भारतासोबतच संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी घरगुती हिंसाचार, लहान मुलांचे शोषण असे बरेच प्रकार घडतात’, असेही ती म्हणाली. पण, कुठेतरी हे सर्व प्रकार थांबवले गेले पाहिजेत असेही तिने स्पष्ट केले.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

कलाकार ‘कास्टिंग काऊच’विषयी फारसे खुलेपणाने बोलत नाहीत, यामागचे कारण काय असावे, असे विचारले असता राधिका म्हणाली, ‘हे बहुधा त्यांच्या मनातील भीतीमुळे झाले असावे. कारण महत्त्वाकांक्षी लोक सर्वात जास्त घाबरलेले आहेत. एखाद्या बड्या प्रस्थाचे नाव घेतल्यानंतर आपले काय होईल, असाच विचार ते करत असावेत. माझ्या मते हेच बदलणे गरजेचे आहे. यासाठी मुख्य म्हणजे प्रत्येकानेच मौन सोडणे गरजेचे आहे.’

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

राधिका नेहमीच फार विचारपूर्वक आपली मतं मांडते. यावेळीसुद्धा तिने या संवेदनशील मुद्द्यावर त्याच पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली. या साऱ्या प्रकरणामध्ये ‘नाही’ म्हणायलासुद्धा शिकले पाहिजे ही बाबसुद्धा तिने अधोरेखित केली. या गोष्टींमध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा विरोध करत ‘नाही’ म्हणणजे फार गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्या महत्त्वाकांक्षी वृत्तीवर विश्वास ठेवा. कारण, इथे कोणा एकाच्या नकाराने काहीच फरक पडणार नसला तरीही दहा जणांनी एखादी गोष्ट नाकारल्यास परिस्थिती नक्कीच बदलेल, असेही ती म्हणाली.