18 March 2019

News Flash

…अन् राधिकाने पायाला गुदगुल्या करणाऱ्याच्या कानशिलात लगावली

या प्रसंगाविषयी सांगितल्यानंतर अनेकांनाच धक्का बसला

राधिका आपटे

महिलाप्रधान आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राधिका आपटेने सुरुवातीपासून या कलाविश्वात आपलं वेगळेण जपलं आहे. मग त्या चित्रपटातील भूमिका असो किंवा एखाद्चा महत्त्वाच्या मुद्द्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया असो. राधिकाभोवती चाहत्यांचं आणि चर्चांचं वलय नेहमीच पाहायला मिळतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कास्टिंग काऊचपासून ते अगदी आपल्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराविषयीसुद्धा ती अगदी खुलेपणाने बोलते. सध्याही राधिका अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या चॅट शोवर नुकतीच तिने हजेरी लावली होती. जिथे गप्पांच्या ओघात तिने आपल्यासोबत घडलेला एक चुकीचा प्रसंग सर्वांसमोर उघड केला. तामिळ चित्रपटसृष्टीत काम करतेवेळीचा तो प्रसंग तिने सर्वांसमोर उघड केला. त्याविषयीच सांगताना राधिका म्हणालेली, ‘चित्रपटाच्या सेटवर उपस्थिती लावण्याचा तो माझा पहिलाच दिवस होता. तेव्हा एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता माझ्या पायांवर गुदगुल्या करु लागला. त्याची ही कृती पाहून मी हैराण झाले. कारण, त्याआधी आम्ही कधीच भेटलोही नव्हतो. मला त्यावेळी जे योग्य वाटलं तेच करत मी त्याच्या कानशिलात लगावली.’

वाचा : टीकाकारांकडे मी लक्षच देत नाही- राधिका आपटे

राधिकाने तिच्यासोबत घडलेल्या या प्रसंगाविषयी सांगितल्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. सध्याच्या घडीला महिलाही सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने चालत असल्या, स्वत:ला सिद्ध करत असल्या तरीही काही बाबतीत मात्र अशा प्रकारच्या प्रसंगाना त्यांना सामोरं जावं लागतं हे पुन्हा एकदा राधिकाने सांगितलेल्या या प्रसंगावरुन सिद्ध झालं आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या वाईट विचारसरणीचा सामना करण्यासाठी महिलांनी धैर्याने पुढे आलं पाहिजे हेच खरं. राधिकानेही बऱ्याच मुलाखती आणि कार्यक्रमांमध्ये हा मुद्दा मांडल्याचं पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी ही अभिनेत्री बऱ्याचदा तिच्या वक्तव्यांमुळे आणि काही पोस्टमुळे अडचणीत आल्याचं पाहिलं गेलं आहे.

First Published on March 14, 2018 2:21 pm

Web Title: bollywood actress radhika apte slapped an actor when he started to tickle her feet