हिंदी चित्रपटसृष्टीत ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी एक अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. ‘अखियों से गोली मारे…’ असं म्हणत चाहत्यांना घायाळ करणारी ही अभिनेत्री आजही अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. सध्या रवीना चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरीही सोशल मीडियावर मात्र तिच्याविषयी बऱ्याच चर्चा रंगत आहेत.

शेतकरी आंदोलनाविषयीचं ट्विट, त्यानंतर तिच्यावर ओढावलेला अनेकांचा रोष या साऱ्यामध्येच आता रवीनाला एका ट्विटर युजरने चक्क लग्नाची मागणी घातली आहे. ४३ वर्षीय ट्विटर युजर अन्वर अलीने रवीनाला थेट लग्नाचीच मागणी घालत तिलाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुख्य म्हणजे त्या युजरने अतिउत्साहात चुकीचं इंग्रजी वापरत रवीनाला लग्नाची मागणी घातली. ज्यानंतर काही नेटकऱ्यांची त्याची चूक लक्षात आणून दिली. खुद्द रवीनानेही त्या युजरच्या ट्विटला उत्तर देत लिहिलं, ‘सॉरी यार… तुम्ही ही गोष्ट विचारण्यासाठी जवळपास १३ वर्षे उशीर केलात’. तिच्या या उत्तरानंतर मात्र लग्नाची मागणी घालणाऱ्या त्या व्यक्तीने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही.

पाहा : kaala video : ‘काला’साठी चेन्नईत अशी साकारली धारावी

सोशल मीडियाच्या माध्यमातून सहसा कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी दूर होते. पण, अनेकदा चाहते किंवा सोशल मीडियावरही फॉलोअर्स बऱ्याच मर्यादांचं उल्लंघन करतात. एखाद्या सेलिब्रिटीला अशी थेट लग्नाची मागणी घालणं हेसुद्धा त्याचच एक उदाहरण आहे, असं अनेकांचं मत आहे. यापूर्वी टिस्का चोप्रा, दिव्या दत्ता आणि शशी थरुर यांनाही लग्नाची मागणी घालण्यात आली होती. बऱ्याच नेटिझन्सनी हा सर्व प्रकार विनोदी अंगाने घेतला असला तरीही त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, हेसुद्धा तितकच खरं.