सध्या करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच कर्नाटकमधील कलबुर्गी जवळील गावात एका धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक लोक एकत्र आले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटद्वारे संताप व्यक्त केला आहे.

रिचा चड्ढाने ट्विटद्वारे संताप व्यक्त करत लोकांना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. ‘तुम्ही सगळे कृपा करुन सध्या देवाला एकटं सोडा. ज्या देवाची तुम्हाला पूजा करायाची आहे ती घरात बसून करा. कृपया घराबाहेर पडू नका. सध्याच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणे मूर्खपणा आहे’ असे रिचाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा व्हिडीओ कलबुर्गी जिल्हातील चितापुरजवळील असल्याचे म्हटले जात आहे. तेथे एक धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक लोक आणि मुले एकत्र जमल्याचे दिसत आहे. तेथे जमलेल्या लोकांवर गुन्हा दाखल केला असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

रिचा चड्ढा ही तिच्या अभिनयासोबतच बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती बऱ्याच वेळा सामाजिक विषयांवर उघडपणे तिचे मत मांडत असते. काही दिवासांपूर्वी तिने वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ जमलेल्या हजारो कामगारांसाठी ट्विट केले होते. ‘हे लोक वांद्रे रेल्वे स्थानकावर तिकिट काढण्यासाठी आले होते. हे लाचार, भूकेने व्याकुळ झालेले दुर्दैवी लोक आहेत’ असे तिने ट्विटमध्ये म्हणत कामगारांना पाठिंबा दिला होता.