अभिनेत्री रेणुका शहाणे चालू घडामोडी, राजकीय प्रसंग आणि इतर मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून त्या बेधडकपणे आपली मतं मांडतात. अनेकदा यासाठी त्यांना ट्रोलसुद्धा केलं जातं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता त्या व्यक्त होतात. त्यासोबतच वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देतात. रेणुका शहाणे यांनी मराठीमध्ये केलेल्या ट्विटला एका युजरने मल्याळम भाषा असल्याचं म्हणत त्यांच्यावर उपरोधिकपणे टीका केली आहे. मात्र या युजरला रेणुका शहाणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेणुका शहाणे ट्विटरच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचं महत्व पटवून देत मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. त्यासोबतच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांचं मतही मांडत आहेत. गुरुवारी रेणुका यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मराठीमध्येही मतदान करा असं म्हटलं होतं. मात्र त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर एका युजरने मराठीला मल्याळम भाषा असल्याचं म्हणत रेणुका यांच्यावर उपरोधिक टीका केली. युजरची ही टीका पाहिल्यानंतर रेणुका शहाणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

“मतदान करण्याविषयी मी जे काही ट्विट केलं होतं ते माझ्या मातृभाषा मराठीमध्ये होतं. ती मल्याळम भाषा नाही आणि मी ज्या भाषेत लिहीलं आहे त्यात न कळण्यासारखं काय आहे ? विशेष म्हणजे मी जरी मराठी भाषेमध्ये मतदान करण्याचं आवाहन केलं असलं तरीदेखील ट्विटरच्या शेवटी हिंदीमध्येदेखील ‘वोट करो, उंगली दिखाओ’, असं म्हटलं होतं. हे वाचून तुम्हाला नक्कीच समजायला हवं की मी साऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे”, असं स्पष्टपणे रेणुका यांनी टीका करणाऱ्याला उत्तर दिलं आहे.

गुरुवारी रेणुका यांनी गुरुवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना मतदान करण्याचा आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी “२९ एप्रिल रोजी मुंबईत मतदान आहे त्यामुळे एक जागरुक नागरिक असल्याची जबाबदारी नक्की पार पाडा. कृपया मतदान करा”, असं कॅप्शन दिलं होतं. मात्र हे कॅप्शन वाचल्यानंतर एका युजरने त्यांच्यावर उपरोधिकपणे टीका केली होती.

दरम्यान, रेणुका शहाणे यांनी अनेक वेळा त्यांचं मत परखडपणे सोशल मीडियावर मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे अनेक वेळा त्यांच्यावर ट्रोल होण्याचीदेखील वेळ आली आहे. मात्र रेणुका यांनी कायम आपलं मत ठामपणे मांडंत ट्रोलकऱ्यांना सडेतोडपणे उत्तर दिलं आहे.