‘अंकुर’ या चित्रपटातून १९७४ साली चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा कलाविश्वात खास दबदबा आहे. गेली अनेक वर्ष बॉलिवूड आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शबाना आझमी यांनी विविधांगी भूमिका वठविल्या. आतापर्यंत १२० पेक्षा अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून भूमिका साकारलेल्या शबाना या लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळलेल्या चाहत्यांना त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

शबाना आझमी यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून लवकरच त्या नव्या चित्रपटात झळकणार असल्याचं सांगितलं आहे. आगामी चित्रपटाच्या सेटवरील एक थ्रोबॅक फोटो त्यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या अमृतसरमधील सुवर्णमंदिराजवळ हात जोडून उभ्या आहेत.

दरम्यान, अद्याप त्यांनी या चित्रपटाच्या नावाचा किंवा चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती सांगितली नाही. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.