अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सिडनी विमानतळावर वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे. शिल्पानं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे राग व्यक्त करत तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली आहे. सिडनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली असं तिनं म्हटलं आहे. शिल्पासोबत असलेलं सामान नमूद करून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं सांगत तिचं सामान सिडनी एअरपोर्टवरच अडवण्यात आलं. शिल्पानं सामानाचा फोटो शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. हे सामान जास्त नव्हतं पण तरीही ते अडवण्यात आलं आहे असं म्हणत तिनं आपला राग व्यक्त केला.

सामानाचा बहाणा करत सिडनी विमानतळावर मला कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. अशा पद्धतीनं कोणतेही कर्मचारी प्रवाशांशी वागत नाही. पण केवळ मी गौरवर्णीय नाही, माझ्या त्वचेचा रंग वेगळा आहे म्हणूनच मला कर्माचाऱ्यांनी वर्णद्वेषी वागणूक दिली तसेच माझ्यावर वर्णद्वेषी टिप्पणीही करण्यात आली असं शिल्पानं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/BoDOpZLhxBH/

सिडनी विमानतळावरून मेलबर्नला प्रवास करत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तिनं विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीवरदेखील वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही शिल्पाला वर्णद्वेषाचा सामान करावा लागला होता. २००७ ती ‘बिग ब्रदर’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी काही स्पर्धकांकडून तिला वर्णद्वेषी वागणूक मिळाली होती.