आपल्यापैकी अनेकांना प्रवास करत असताना रस्त्याच्या मध्येच कार बंद पडण्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले असेल. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही नुकताचा हा अनुभव आला. रात्रीच्या वेळी भररस्त्यात सोनाक्षीची कार बंद पडली. फारच उशीर झाल्यामुळे मॅकॅनिकला शोधण्यापूर्वी खुद्द सोनाक्षीनेच कारला धक्का देत ती सुरु करण्याचे प्रयत्न केले. हा संपूर्ण प्रसंग तिने सोशल मीडियावरही न विसरता शेअर केला.

इन्स्टा स्टोरीच्या सहाय्याने सोनाक्षीने कार ढकलतानाचे छोटे व्हिडिओ पोस्ट केले. त्यातील एका व्हिडिओला तिने ‘ब्लंडर वुमन’ असे कॅप्शनही दिले. दुसऱ्या एका व्हिडिओला तिने ‘अकिरा मोड ऑन’ म्हणजेच ‘मी आता पुन्हा अकिराच्या रुपात आलेय’, असे कॅप्शन दिले. काही मित्रमंडळींनी सोनाक्षीला कारला धक्का देण्यास मदत केली आणि थोड्या वेळात त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आणि कार सुरु झाली.

वाचा : जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’

‘अकिरा’ या चित्रपटात सोनाक्षीने तडफदार मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सोनाक्षीने साहसी दृश्येही त्याच ताकदीने साकारली होती. इतकेच नव्हे तर शत्रूशी लढणारी अकिराही या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. तिचा हा मर्दानी लूक अनेकांना पसंत पडला होता. बंद पडलेली कार सुरु करतेवेळीसुद्धा तिचे हेच रुप पाहायला मिळाले. एखाद्या मुलाप्रमाणे पुढे येत तिने मोठ्या ताकदीने कारला धक्का देण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच ‘आपण पुन्हा एकदा अकिरा झालो आहोत’, असे कॅप्शन देत तिने तो व्हिडिओ इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला होता. सोशल मीडियावर सोनाक्षीची ही इन्स्टा स्टोरी बरीच चर्चेत होती.