अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कलाविश्वापासून दूर असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. सध्या ती परदेशात असून कॅन्सरवर उपचार घेत आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी सोनालीने आपल्याला कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकानेच तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

मेटास्टेटीक कॅन्सरशी लढा देणाऱ्या सोनालीने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये तिचा वेगळाच लूक पाहायला मिळाला होता. सध्या सुरु असणारे उपचार आणि पुढे येणारी परिस्थिती या साऱ्यासाठी सोनाली मोठ्या धीराने उभी असल्याचंच या पोस्टमधून स्पष्ट झालं. आता तिने आणखी एक पोस्ट करत मुलासोबतचं सुरेख नातं सर्वांसमोर आणलं आहे.

आपल्याला कॅन्सर झाल्याचं ज्यावेळी मुलाला सांगितलं तेव्हा त्याची नेमकी काय प्रतिक्रिया होती, याविषयी सोनालीने या पोस्टमधून सांगितलं आहे.

वाचा : हाय ग्रेड कॅन्सरसाठी सोनालीची ‘ही’ चूक पडली महागात

‘१२ वर्षे, ११ महिने आणि आठ दिवसांपूर्वी जेव्हापासून तो माझ्या आयुष्यात आला तेव्हापासूनच त्याने माझ्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनच गोल्डी आणि माझ्यासाठी त्याचा (मुलाचा) आनंदच केंद्रस्थानी होता. त्यानंतर आता जेव्हा या आजाराने (कॅन्सरने) डोकं वर काढलं तेव्हा त्याला याविषयी सांगावं तरी कसं, हाच प्रश्न आम्हाला पडला होता. आम्ही त्याची काळजी करत होतोच. पण, परिस्थितीविषयी त्याला माहिती करुन देणंही तितकच महत्त्वाचं होतं. आम्ही त्याला नेहमीच सर्व गोष्टी सांगत आलो आहोत आणि यावेळीही काही वेगळं नसणार होतं. त्याने कॅन्सरविषयी कळताच अगदी संयमाने, मोठ्या प्रगल्भतेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणापासून तो माझ्यासाठी प्रेरणेचा आणि आशेचा एक स्त्रोत झाला आहे. अनेकदा तर तो माझ्या पालकस्थानी असल्यासारखाही वागतो, मला काय करायचं आहे, काय नाही, याची आठवण करुन देतो’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यासोबतच रणवीरसोबत आपण जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असल्याचंही तिने सांगितलं आहे.

अशा प्रकारच्या परिस्थितीविषयी मुलांना योग्यवेळी माहिती देणं गरजेचं असून आयुष्याचं हे कटू सत्य त्यांना कळू द्यावं असं सोनालीचं म्हणणं आहे. आपल्या मुलासोबत वेळ व्यतीत करणाऱ्या सोनालीला सध्या त्याची खोडकर वृत्ती या साऱ्या प्रसंगांमध्ये ताकद देत असून, तिला वेगळीच प्रेरणा देत आहे हे खरं.