अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यानंतर संपूर्ण कलाविश्वातून सोनमला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्या मेहंदीपासून ते लग्नसोहळा आणि रिसेप्शनपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या समारंभांना बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. जे सेलिब्रिटी तिच्या रिसेप्शनला हजेरी लावू शकले नाहीत त्यांनीही सोनमला न विसरता शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्माचं.

अनुष्काने ट्विट करत सोनमला शुभेच्छा दिल्या. ‘आयुष्याच्या या वळणावर तुला खूप खूप शुभेच्छा. हा प्रवास खरंच खुप सुंदर आणि आयुष्यात पुढे नेणारा आहे….’, असं ट्विट करत सोनमला ‘वेलकम टू द क्लब’ असं म्हणत वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या ट्विटनंतर सोनमनेही लगेचच उत्तर देत तिचे आभार मानले. त्याशिवाय लग्नसोहळ्यादरम्यान विराट आणि तिची कमतरता जाणवली असंही ती म्हणाली. या दोन्ही अभिनेत्रींचा ट्विटरवरील हा संवाद अनेकांचीच मनं जिंकून गेला.

वाचा : महेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…

‘भेन’ या कापडाच्या लक्झरी ब्रँडचा मालक असणाऱ्या आनंद अहूजासोबत सोनम जवळपास गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. ज्यानंतर त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. शीख पद्धतीने पार पडलेल्या सोनमच्या या विवाहसोहळ्यात कपूर कुटुंबियांचा उत्साह पाहण्याजोगा होता. मेहंदी सोहळा म्हणू नका किंवा मग सोनमचं रिसेप्शन सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्याच चर्चा पाहायला मिळत होत्या.